लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘अर्धवट झोपलेलो असताना अचानक गाडी थांबली. बाहेर डोकावून बघितले तर रात्रीचा अंधार, बसमधील लाईटमुळे आजूबाजूला पाणी असल्याचे पहायला मिळाले. वाहक, चालक फोनवर संपर्क साधत होते. त्यांच्या बोलण्यातून आम्ही पुराच्या पाण्यात अडकलो असल्याची जाणीव झाली. भितीने अक्षरश: गाळण उडाली. वाचण्याची आशा काही दिसत नव्हती. एका क्षणी तर आम्ही आता मरणारच असं वाटलं आणि हातपाय गळाले.’ अंगावर शहारे आणणारी ही हकीकत आहे, करवीर तालुक्यातील रजपूतवाडीजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांची.
दोन दिवस झाले. २२ प्रवासी व वाहक, चालक सध्या कोल्हापुरातील मुस्लीम बोर्डींग येथील निवारा केंद्रात वास्तव्यास आहेत. शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी घडलेली सर्व हकिकत सांगितली. गुरुवारी रात्री साडे आठ वाजता विजापूरहून बस रत्नागिरीस निघाली होती. रात्री दीड वाजता ही बस करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे आली. चालकाला अंदाज न आल्याने बस पाण्यात गेली. थोडे अंतरावर गेल्यावर पाण्यातच गाडी बंद पडली. झोपी गेलेले प्रवासी जागे झाले. बाहेर डोकावून बघितले तर चारीबाजूने पाणी होते. त्यात बस बंद पडली. त्यामुळे प्रवासी घाबरले.
चालक श्रीशाल बाेळेगाव यांनी मोबाईलवरून कंट्रोल रुमला फोन केला. त्यांनी दोन क्रमांक दिले आणि त्यावर फोन करा असे सांगितले. त्यानंतर फोन झाले. तासाभराने तीन व्यक्ती पाण्यातून चालत आल्या. त्यांनी परिस्थिती पाहून बोट मागवून घेतली. त्यातून सात महिला, सहा मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पहाटे चार वाजता एक बोट आली. तोपर्यंत नऊ पुरुष बसमध्येच थांबून होते. तोपर्यंत बसमध्ये पाणी शिरले. जवळपास सर्व सीट पाण्यात बुडाल्या. सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. आता आपण काही जगत नाही, मरणार अशीच सर्वांची धारणा झाली. तोच बोट आली. सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आल.
बस वाहक आब्बास आली मुल्ला यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानले आहेत, आमच्या कर्नाटकात सुध्दा इतक्या रात्री मदत मिळाली नसती, ती कोल्हापुरात मिळाली. आम्ही को्ल्हापूरकरांचे उपकार कधीही विसरू शकणार नाही, असे मुल्ला म्हणाले.