कोल्हापूर : संस्थेत राहणाºया मुलांना दैनंदिन गरजांसाठी लागणाºया वस्तू, खाऊ यांपेक्षाही मायेच्या ओलाव्याची गरज असते. अन्य मुलांप्रमाणे आपल्याशीही प्रेमाने बोलणारे पालक आहेत, ही भावना त्यांचे आयुष्य बदलून टाकते. पालकांविना जगणारे एकही मूल प्रेम आणि स्नेहापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी ‘जिजाऊ’ संस्थेने सुरू केलेला उपक्रम अभिमानास्पद आहे, असे उद्गार खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी काढले.
आपल्या मायेच्या पंखांखाली रयतेला सामावून घेतलेल्या जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून संयोगिताराजे छत्रपतींच्या संकल्पनेतून ' जिजाऊ... मायेचे पंख अन् संस्कारांची सावली’ ही चळवळ बालकल्याण संकुलामध्ये सुरू करण्यात आली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संयोगिताराजे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, संस्थेचे विश्वस्त व्ही. बी. पाटील, नंदिनी पटोडिया, उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, बालकल्याण समितीच्या प्रिया चोरगे उपस्थित होत्या.
ते म्हणाले, काही कारणांमुळे लहान मुलांच्या डोक्यावरून पालकांच्या मायेचे छत्र हरवते. आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण आपण त्या मुलांशी प्रेमाने संवाद साधून मायेची ऊब देऊ शकतो. त्यामुळे मुलांतील वंचिततेची भावना कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. या उपक्रमांतर्गत नावनोंदणी केलेल्या पालकांनी, व्यक्तींना मुलांना प्रेम द्यावे. बालकल्याण संकुलाला आमच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.संयोगिताराजे म्हणाल्या, अनेक लोक संस्थेत येऊन वाढदिवस साजरा करतात.
मुलांना कपडे, खाऊचे वाटप करतात; पण ते स्वीकारताना मुलांच्या मनात आपल्यावर कोणीतरी उपकार करीत असल्याची भावना निर्माण होते. येथे गरज आहे ती मनाच्या श्रीमंतीची. पुढाकार घेतलेल्या पालकांनी आपल्याला जमेल त्यावेळी आठवड्यातून एकदा संस्थेत येऊन मुलांसोबत फक्त वेळ घालवायचा आहे. त्यांच्या भावना समजून घेत आई-वडिलांप्रमाणे स्नेह आणि प्रेम द्यायचे आहे. ही चळवळ एक दिवस किंवा कोल्हापूरपुरती मर्यादित न ठेवता राज्यभरात तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
धैर्यशील माने यांनी आपल्या मनोगतात बालकल्याण संकुलामध्ये राहणाºया मुलांमध्ये खरी धर्मनिरपेक्षता पाहायला मिळते, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंच्या कार्याची माहिती दिली. ‘जिजाऊ’ या चळवळीत आपण सक्रिय सहभाग घेणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.सुरेश शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. पद्मजा तिवले यांनी आभार मानले.कोल्हापुरात ‘जिजाऊ’ या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मायेचे पंख’ उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी बालकल्याण संकुलामध्ये संयोगिताराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी धैर्यशील माने, डॉ. अमर आडके, पद्मजा तिवले, प्रिया चोरगे, व्ही. बी. पाटील, खासदार संभाजीराजे उपस्थित होते.