कोल्हापूर : एका हाताने कधी टाळी वाजतही नाही आणि टाळीसाठी दोन्ही हात एकत्र करायचेच नाहीत, हा अलिखित नियम आपल्या समाजाने अमलात नाही आणला तर नवलच. सर्वच स्तरावर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्यात येत असताना ‘गांधारी’ची भूमिका बजावणाऱ्यांना जागरूक करणे कठीण काम आहे. कोल्हापुरातील रेल्वेफाटक परिसरातील भिंतीवर महानगरपालिकेने स्वच्छता अभियानासाठी फलक लावूनही तेथे असा मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग पहावयास मिळतो.
कोल्हापूर शहर स्वच्छ राहावे म्हणून महापालिकेतर्फे अनेकदा स्वच्छता अभियान राबविण्याबरोबरच ठिकठिकाणी जनजागृतीसाठी सुंदर-आकर्षक फलक लावण्यात आले आहे; तरीही स्वच्छता राखा असे फलक नजरेसमोर दिसत असतानाही काही छोटे-मोठे व्यावसायिक, नागरिक, भाजीपाला विक्रेते हे बिनधास्तपणे शहरातील राजारामपुरी रोडसमोर रेल्वेफाटकजवळ असा कचरा टाकून आपल्या अस्वच्छ मनाच्या संस्कृतीचे दर्शन घडवित आहेत.
त्यामुळे हे शहर स्वच्छ राहीलच कसे? या अस्वच्छतेला नेमके कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी असे दृष्य कोल्हापुरात पहायला मिळते. जिथे जिथे महापालिका प्रशासनाने स्वच्छता अभियानविषयी जनजागृतीचे फलक लावले आहेत, नेमके त्याचठिकाणी काही नागरिक बिनधिक्कतपणे कचरा टाकण्याचे धाडस करून आपल्या स्वच्छ शहराचा चेहरा अस्वच्छ बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महापालिकेने शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि नागरिक कचरा करण्यासाठी पुढे येत असतील, तर अशा अस्वच्छ शहराचा चेहरा बनविण्यासाठी नेमके कोण जबाबदार असाच सवाल येथे उपस्थित होत आहे.