कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेतील मुलांसाठी शासनाकडून दरवर्षी दोन गणवेशांचे पैसे दिले जातात. यंदाच्या वर्षी मात्र एकाच गणवेशाचे पैसे दिले जाणार आहेत. बीआयएस स्टॅण्डर्डप्रमाणे कापडाची अट घालण्यात आली आहे. परंतु, ३०० रुपयांत चांगल्या दर्जाचा गणवेश कसा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
समग्र शिक्षा मोफत गणवेश योजनेतून महापालिकेतील ५८ शाळेतील सर्व मुली, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील मुलांना दोन गणवेशांसाठी अनुदान दिले जाते. कोल्हापूर महापालिकेतील ६५२८ विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. यंदाच्या वर्षासाठी १९ लाख २८ हजारांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. दरवर्षी दोन गणवेशांसाठी ६०० रुपये दिले जात होते. यंदाच्या वेळी एका गणवेशासाठी ३०० रुपयेच आले आहेत. महापालिकेकडून तो लवकरच वितरित केला जाणार आहे. मात्र, गणवेशाच्या कापडासाठी बीआयएस स्टॅण्डर्डप्रमाणे कापड असण्याची अट घातली आहे.