कोल्हापूर : हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) येथील मुरलीधर पाटील यांच्या मालकीची लाकडी केबीन गावातील काही व्यक्तींनी चोरली. त्याबाबत पोलिसांनी जुजबी कारवाई केली. पण चोरलेली केबीन मिळाली नाही, त्यामुळे पोलीस आणि भ्रष्टाचारी लोकांच्या संगनमतामुळे आपल्यावर अन्याय झाला असून न्याय मागण्यासाठी पाटील यांनी गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले.
हनिमनाळ येथील मुरलीधर पाटील यांनी उदरनिर्वाहासाठी गावातच भाजी पाला विक्रीसाठी खोका उभारला होता. दि. २८ जानेवारीला काही गावगुंडांनी गावातील सभागृहासमोरील त्यांच्या मालकीची लाकडी केबीन चोरली. त्यानंतर पाटील यांच्या तक्रारीवरून गडहिंग्लज पोलिसांत प्रदीप पाटील, अभिजित कुलकर्णी, शिवमूर्ती पाटील, भरमू कांबळे, राजेंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी तिघा संशयितांवर जुजबी कारवाई केली. पण गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर जप्त केला नाही. तसेच चोरीला गेलेल्या केबीनचाही तपास पुढे सरकला नाही. काही पोलिसांनी संगनमत करून, चोरट्यांना सहकार्य केले आहे. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वच अधिकारी आणि गावातील भ्रष्ट लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत मुरलीधर पाटील यांनी गुरुवारी दिवसभर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले.