कोल्हापूर : शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिकेने सुरू केलेल्या बारा संकलन केंद्रांवर बुधवारी एका दिवसात सुमारे एक टनापेक्षा अधिक प्लास्टिक व थर्माकोल जमा झाले. दंडात्मक कारवाईच्या भीतीने व्यापारी, विक्रेत्यांसह काही नागरिक स्वत:हून संकलन केंद्रांवर जाऊन प्लास्टिक जमा करीत असल्याचे दिसून आले.
राज्यात प्लास्टिक व थर्माकोल विक्री व वापरावर बंदी घातली असून, त्याची कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांत शहरात ठिकठिकाणी छापे टाकून दुकानदार, घाऊक विक्रेत्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोणत्याही क्षणी बाजारपेठेत जातात. अचानक तपासणी करतात. त्यामुळे प्लास्टिकची विक्री व त्याचा वापर टाळला जात आहे. बाजारपेठेतून प्लास्टिकच्या पिशव्या, कंटेनर, थर्माकोल गायब झाले आहे.
सोमवारी महानगरपालिकेत आयुक्त अभिजित चौधरी यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहराच्या विविध भागांत १२ संकलन केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंगळवारी सुटी असल्याने ही संकलन केंद्रे सुरू झाली नव्हती. बुधवारी मात्र ती सुरू झाली. तेथे बंदी घालण्यात आलेले प्लास्टिकचे सर्व प्रकारचे साहित्य, पिशव्या, तसेच थर्माकोल जमा करण्यास सुरुवात झाली. एका दिवसात सुमारे एक टन साहित्य जमा झाल्याचे सांगण्यात आले. जमा झालेल्या सर्व साहित्याच्या वर्गीकरणात कर्मचारी गुंतले होते. या साहित्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे, तर थर्माकोल हे एका केमिकलमध्ये भिजवण्यात येणार आहे. या केमिकलमुळे काही वेळांतच थर्माकोलचे पाणी होते. हे पाणी नंतर जमिनीत मुरवले जाणार आहे.
आरोग्य विभागाचा सगळा रोख प्लास्टिकच्या साठेबाजाकडे असून आज, गुरुवारी औद्योगिक वसाहती, गांधीनगर रोडवरील घाऊक विक्रेते, शहरातील सर्व हॉटेल्सची तपासणी केली जाणार आहे. एकदा साठे जप्त केले की त्याची विक्री होणार नाही, असा महापालिका अधिकाºयांचा दावा आहे.चार ठिकाणी कारवाईशहरात मंगळवारी आरोग्य विभागाने चार ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची विक्री केल्याबद्दल कारवाई केली. माधुरी डेअरी, सागर स्वीटस्, श्रीकृष्ण चिप्स, खेमराज बेकरी यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. या सर्वांकडून प्रत्येक पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.