कोल्हापूर : नोटा रस्त्यावर पडल्याचा बनाव करीत पाच चोरट्यांनी पाळत ठेवून वृद्ध मोटारचालकाची दिशाभूल करीत त्याला मोटारीचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले, त्यातच नजर चुकवून मोटारीतील महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग व मोबाईल संच लांबविल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी ११ वाजता नेहमी गजबजलेल्या रहदारीच्या शाहूपुरी रेल्वे फाटकनजीक रस्त्यावर ही घटना घडल्याने खळबळ उडाली.
सोमवारी ११ वाजण्याच्या सुमारास रेल्वे फाटकनजीक एका बँकेनजीक एक वृद्ध मोटारचालक आपली गाडी उभी करून थांबले होते. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची तसेच रहदारीची वर्दळ होती. त्यावेळी अज्ञात पाच चोरट्यांनी काही मिनिटे या मोटारीच्या भोवती फिरून टेहाळणी केली. त्यानंतर त्यापैकी काहींनी एकमेकाशी अनोळखी असल्याचे भासवले. त्या सर्वांनी मोटारीस घेरले. त्यापैकी एकाने मोटारीच्या चालकाच्या बाजूला रस्त्यावर नोटा पडल्याचा बनाव करुन वृद्ध चालकास सेंट्रल लॉक काढण्यास भाग पाडले.
त्याचवेळी त्याला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूला असणाऱ्या चोरांनी मोटारीचा पलीकडील दरवाजा उघडून आतील महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग व मोबाईल संच लंपास केला. हाती मुद्देमाल आल्यानंतर सर्व चोरटे पळून गेले. त्याचेवळी वृद्ध चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने आरडाओरड केले, पण तोपर्यत सर्वांसमक्ष चोरट्यांनी धूम ठोकली. पण त्याबाबत रात्री उशिरापर्यत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.
भरदिवसा प्रकार घडूनही पोलीस अनभिज्ञ
शहराच्या मध्यवस्तीत, नेहमी गजबजलेल्या शाहूपुरी रेल्वे फाटकानजीक टेहाळणी करून मोटारचालकाला लुटण्याचा प्रकार घडूनही रात्रीपर्यत शाहूपुरी पोलीस अनभिज्ञ होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला तरीही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवून माहीत नसल्याचे सांगितले. तसेच घटनास्थळी कुणीही पोलीस फिरकला नसल्याचे परिसरातून सांगण्यात आले.
लुटीचा व्हिडीओ व्हायरल
घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर गतीने व्हायरल झाला. त्याबाबत शहरात चर्चा सुरू असताना त्याचा शाहूपुरी पोलिसांना थांगपंता लागला नाही, हेच विशेष.