पन्हाळा : शिवछत्रपतींची इंग्लंडमधील जगदंबा तलवार भारतात परत शासन आणण्याबाबत जोपर्यंत गांभीर्याने विचार करत नाही तोपर्यंत शिवदुर्ग संवर्धनचे मावळे येथून जाणार नाही, या भूमिकेत सुमारे पाऊणशे जण सज्जाकोठी येथील दुसऱ्या मजल्यावर सर्वजणांनी कोंडून घेतले होते. रात्री उशिरा पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी हे आंदोलन किंवा कोंडून घेणे थांबवावे या आवाहनाला प्रतिसाद देत हे आंदोलन थांबविल्याचे हर्षल सुर्वे यांनी सांगीतले.
शिवछत्रपतींच्या अनेक तलवारींपैकी करवीर छत्रपती घराण्याकडे असणारी एक जगदंबा नावाची तलवार आज इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहालयात असणाऱ्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ठेवण्यात आली आहे. ही तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) हे अल्पवयीन (११ वर्षे) असताना इंग्लंडचा तत्कालिन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला असता सन १८७५-७६ मध्ये त्यांना जबरदस्तीची भेट म्हणून दिली होती. ही इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी, अशी तमाम शिवभक्तांची भावना आहे. यासाठी आजची आमची कठोर भूमिका आसल्याची माहिती शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या बैठकीतून देण्यात आली .
शिवछत्रपतींच्या तलवार मिळवण्याबाबत आंदोलनचा एक भाग म्हणून पन्हाळा येथील शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन हे कठोर आंदोलन सुरू केल्याचे संवर्धनचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले. मोडीलिपी तज्ज्ञ अमित आडसुळ, राम यादव, रवी कदम, फिरोजखान उस्ताद, सचिन तोडकर, किरण चव्हाण, अमृता सावेकर, हरीश पटेल, योगेश नागांवकर आदी सुमारे पाऊणशे शिवप्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होेते. पोलीस बंदोबस्त व पुरातत्वचे कर्मचारी या ठिकाणी प्रशासनाबरोबर संवाद साधताना दिसत होते. छत्रपती संभाजीराजे यांनी जगदंबा तलवार परत आणण्यास कटिबद्ध आहे, असे पत्रात आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करत असल्याचे शिवदुर्ग संवर्धनचे कार्यकर्ते यांनी सांगितले.
फोटो २९ पन्हाळा
पन्हाळा येथील सज्जाकोठीच्या दुसऱ्या मजल्यावर बसलेले शिवदुर्ग संवर्धनचे शिवप्रेमी.