लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा व लसणाच्या दरात थोडी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात कांदा १४ रुपये तर लसूण ४५ रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. सरकी तेलाच्या दरात वाढ सुरू असून, किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नसली तरी पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.
गेली तीन-चार महिने कांद्याने चांगलाच भाव खाल्ला होता. किरकोळ बाजारात ६० रुपये किलोपर्यंत कांदा पोहचला होता. मात्र, या आठवड्यात दरात घसरण होत गेले असून, घाऊक बाजारात सरासरी १४ रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. बटाट्याच्या दरातही घसरण झाली असून, सहा महिन्यांत पहिल्यांदाच १३ रुपये किलोपर्यंत दर आले आहेत. लसणाचे दर ४५ रुपये असून किलो मागे दहा ते पंधरा रुपये दर कमी झाला आहे.
भाजीपाल्याच्या दरात फारशी चढउतार नसली तरी वांगी, ओली मिरची, घेवड्याच्या दरात काहीसी घसरण झाली आहे. कोबी, टोमॅटो, ढब्बू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंंडी, वरणा, दोडक्याचे दर स्थिर आहेत. कोथंबिरीची आवक वाढली आहे. बाजार समितीत रोज ३५ हजार पेंढ्यांची आवक होते. त्यामुळे दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात ४०० रुपये शेकडा झाला आहे. मेथी, पालक व पोकळा या पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली असून दहा रुपयाला तीन पेंढ्या असा दर झाला आहे.
सरकी तेलाचे दर चढेच राहिले असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात १४५ रुपये किलोपर्यंत तेल पोहचल्याने सामान्य ग्राहकांना चांगलाच चटका बसला आहे.
लिंबूच्या मागणीत वाढ
उष्मा वाढू लागल्याने शीतपेयांची मागणी वाढली आहे. त्यामुळे लिंबूच्या मागणीत वाढ झाली असून दरही तेजीत आहेत. किरकोळ बाजारात दहा रुपयाला तीन लिंबू झाले आहेत.
‘ब्याडगी’ बरोबर ‘सिजेंटा’ मागणी
लाल मिरचीची मागणी वाढली असून ‘ब्याडगी’ व ‘सिजेंटा’ मिरचीला अधिक मागणी आहे. ‘ब्याडगी’च्या तुलनेत ‘सिजेंटा’च्या दरात किलोमागे ५० ते ७० रुपयांचा फरक आहे.
फोटो ओळी :
१) लसणाची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. रविवारी लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात ४५ रुपये किलो दर होता. (फोटो-१४०३२०२१-कोल- बाजार)
२) उष्मा वाढल्याने लिंबूच्या मागणीतही वाढ झाली आहे. (फोटो-१४०३२०२१-कोल- बाजार०१) (छाया- नसीर अत्तार)