कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा-बटाट्याची आवक वाढली आहे, पण घाऊक खरेदीदारांकडून उठावच नसल्याने गोडावून फुल्ल झाले आहेत. येणारा माल ठेवायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर आज, शुक्रवारी आणि उद्या, शनिवारी असे दोन दिवस कांदा-बटाट्याचे सौदेच न काढण्याचा निर्णय अडत्यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी ‘जीवनावश्यक सेवा’ म्हणून बाजार समितीतील वाहतूक आणि सौदे सुरुच आहेत. कांदा-बटाटा येथे पिकत नसला तरी दर चांगला मिळत असल्याने श्रीगोंदा, नगर, जेजुरी, इंदौर, आग्रा येथील शेतकऱ्यांकडून कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि बटाटा सौद्यासाठी पाठविला जातो.
आता कांदा-बटाट्याच्या काढणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने कोल्हापुरात येणारी आवकही वाढली आहे. गुरुवारी ११ हजार ७५२ पिशव्या कांदा तर २ हजार ७४५ पिशव्या बटाट्याच्या आल्या. बुधवारी तर कांद्याच्या २० हजार ७२४ तर बटाट्याची ११८० पिशव्या आवक झाली होती. आवक प्रचंड वाढल्याने गोडावूनमध्ये ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे. गोडावून भरल्याने रस्त्यावरच माल उतरवून घेतला जात आहे.
आवक २० हजार पिशव्यांची आहे, पण विक्री मात्र ४ ते ५ हजार पिशव्यांचीच होत आहे. मागणी आणि मालाला उठावच नसल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. आवक वाढली असल्याने दर वाढणार ही अफवा आहे, दर १० ते १७ रुपये किलो असेच राहणार आहेत.मनोहर चुग, कांदा-बटाटा व्यापारी, बाजार समिती, कोल्हापूर