लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ यासाठी गेली आठ दिवस लॉरी ऑपरेटर्सने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अनेक बैठका झाल्या, मात्र त्यातून तोडगा निघाला नसून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील रोजची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. समितीचे राेजचे एक लाख रुपये उत्पन्न घटले आहे.
गाडीत ज्या व्यापाऱ्याचा माल आहे, त्यानेच हमाली द्यायची हा मुद्दा घेऊन लॉरी ऑपरेटर्सने राज्यभर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. लॉकडाऊननंतर आता कोठे बाजार स्थिरस्थावर होत असताना हमालीवरून गेली आठ दिवस मार्केट ठप्प झाले आहे. बाजार समिती, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन व व्यापारी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या; मात्र त्यातून काहीच तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित घटकांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातही यश आले नाही. लॉरी ऑपरेटर्स आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने गुंता वाढला आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवार, बुधवार व शनिवारी हे तीन दिवस प्रत्येकी ५० गाड्या कांद्याची आवक होते, तर मंगळवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस प्रत्येकी ३० गाड्यांची आवक होते. आठवड्याचा विचार केल्यास २४० ते २५० गाड्या कांद्याची आवक होते. मात्र, गेल्या आठ दिवसांत जेमतेम ७० गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. या उलाढालीवर बाजार समितीचे उत्पन्न अवलंबून असते. समितीला कांद्यातून सुमारे एक लाख रुपये मार्केट सेस गोळा होतो. त्यामुळे त्यांनाही आठ लाखांचा फटका बसला आहे.
कोट-
कांदा-बटाट्यासह इतर वाहतुकीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मंत्री महोदयांनी बैठका घेतल्या, मात्र त्यात ठोस निर्णय झालेला नाही.
- सुभाष जाधव (अध्यक्ष, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन)