कोल्हापूर : आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल आता लागली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना शहरात ठिकठिकाणी मांडलेल्या गणेशमूर्तींच्या स्टॉलनी या भीतीच्या वातावरणातही उत्साहाची चेतना नागरिकांमध्ये भरली आहे, तर शासनाच्या नियमांचे पालन करत अनेक मूर्तिकारांनी ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे.यंदा गणेशोत्सव २२ ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणपती म्हणजे सर्वधर्मीय नागरिकांचा, लहानमोठे अशा सगळ्या वयोगटातील नागरिकांचा आवडत देव. गणेशोत्सवाच्या भक्तीने भरलेल्या दिवसांत प्रत्येकजण आपले ताणतणाव विसरून या उत्सवात सहभागी होतो. ही ऊर्जा वर्षभरात येणाऱ्या संघर्षांशी लढण्याचे बळ देते. म्हणूनच गरीब, श्रीमंत सगळे आपल्या परीने हा उत्सव साजरा करतात.गेल्या वर्षी महापूर आणि यंदा कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर आहे. उत्सव साजरा करण्यावर शासनाने मर्यादा आणल्या आहेत. राज्यात अजूनही लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्यातील सात दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर जिल्हा प्रशासनाने नियम शिथिल केले आहेत.
त्यामुळे सोमवारी शहर व उपनगरांत प्रमुख रस्त्यांच्या कडेला गणेशमूर्तीचे स्टॉल सजले आहेत. या स्टॉलवर मांडलेल्या सुंदर आकर्षक गणेशमूर्ती मन मोहून टाकत आहेत. सध्याच्या भीतीच्या वातावरणात ही मूर्ती लढण्याचेच जणू बळ देत आहे.गणेशमूर्ती बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून अनेक कुंभार बांधवांनी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात केली आहे. ओळखीचे नागरिक, ठरलेले ग्राहक यांना व्हॉट्सॲपवर मूर्तीचे फोटो पाठविले जात आहेत. यासह समाज माध्यमांवर मूर्तीचे फोटो अपलोड केले जात आहेत.दर जैसे थेकोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे कुंभार बांधवांनी देखील मूर्तींच्या दरात फार वाढ केलेली नाही. प्लास्टरच्या एक ते दीड फुटाच्या मूर्ती सहाशे ते हजार, पंधराशे रुपयांपर्यंत आहेत. शाडूच्या मूर्तीदेखील कलाकुसरीप्रमाणे कमीअधिक दराने उपलब्ध आहेत.
इको फ्रेंडली मूर्तींना मागणीकोरोनामुळे यंदा शासनाने कुंभार बांधवांना प्लास्टरच्या मूर्ती विकण्यास परवानगी दिली आहे. मात्र, पर्यावरणाविषयी वाढलेल्या जागृतीमुळे यंदा मातीच्या इको फ्रेंडली मूर्तींना मागणी वाढली आहे.- सतीश वडणगेकर,मूर्तिकार