कोल्हापूर : कोल्हापुरात सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे ऑनलाइन दर्शन एका क्लिकवर बुधवारपासून महापालिका व सेवा इन्फोटेक यांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. ‘ईझी कोल्हापूर’ ॲप डाऊनलोड केल्यास सर्वांना ऑनलाइन गणेशोत्सव सुविधा उपलब्ध होईल.
ऑनलाइन ॲप मंगळवारी दुपारी उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले आहे. यावेळी सेवा इन्फोटेकचे जयराज चव्हाण, परवाना अधिक्षक राम काटकर, सिस्टिम मॅनेजर यशपालसिंग रजपूत उपस्थित होते.
सन २०१९ सालापासून ईझी कोल्हापूर ॲपद्वारे शहरातील नागरिकांना घरी बसल्या कोल्हापूरमधील सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती आरास यांच्या देखाव्यांचे फोटो, व्हिडिओ, तालमींचा इतिहास, मंडळांची वैशिष्ट्ये अशी भरपूर माहिती या ॲपवर उपलब्ध केलेली आहे. या ॲपमध्ये ठराविक मंडळांच्या ३६० डिग्री फोटोची सुविधा लक्षवेधी ठरणार आहे.
यासाठी शहरातील गणेश मंडळांनी आपली माहिती या ॲपवर प्रसिध्द करता येणार आहे. ॲपवर ऑनलाइन आपली माहिती अपलोड करावयाची आहे. त्याचबरोबर घरगुती आरासची देखावे ही आपल्याला या ॲपमध्ये अपलोड करता येणार आहे. ॲप सुरू करण्यासाठी प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागणार आहे. ऑनलाइन दर्शनाची सुविधा नागरिकांनी घेऊन रस्त्यावरील गर्दी कमी करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.