समीर देशपांडेकोल्हापूर : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जरी ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग राबविला जात असला तरी तो अनेक ठिकाणी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांचाही सुरुवातीचा उत्साह ओसरला असून प्रत्यक्ष शिक्षकांकडून होत असलेल्या अध्यापनाच्या तुलनेत शाळकरी मुलांना हे शिक्षण बांधून ठेवू शकत नसल्याच्याही प्रतिक्रिया आहेत. मात्र, त्यातही अनेक शाळा आणि शिक्षक चिकाटीने विद्यार्थ्यांना मनापासून अध्यापन करत आहेत.कोल्हापूर १०२५ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या १९७६ शाळा आहेत. त्यातील १५३३ शाळांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाची आकडेवारी सांगते. त्याचा लाभ १ लाख १ हजार ०६१ विद्यार्थ्यांना होत असून ज्या ठिकाणी मोबाईल रेंजची अडचण आहे अशा गावांतील ६२ हजार ७०१ विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण दिले जात असल्याचा दावा शिक्षण विभाग करत आहे तर ३०४४ विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे सध्या शिक्षण दिले जात नाही.
मात्र, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड, भुदरगड यासारख्या दुर्गम तालुक्यांमध्ये जेथे मोबाईलची रेंजच नाही. त्या ठिकाणी प्रत्यक्ष गावात, वाड्यावस्त्यांवर जाऊनही अध्यापन करण्यात शिक्षक मागे पडलेले नाहीत. मात्र, करणारेच करतात, असेही चित्र आहे.करनूर (ता. कागल)- शिक्षक व्हिडिओ पाठवतात; परंतु त्याचे मुलांना प्रभावीपणे आकलन होत नाही. प्रत्यक्ष अध्यापन आणि या शिक्षणामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. रोज वेगवेगळे विषय पाठविले जातात. त्यामुळे अध्यापनामध्ये संग्लनता राहत नाही.नरंदे (ता. हातकणंगले)- रोज मोबाईलवरती शिक्षक दोन, तीन विषयांचा अभ्यास देतात. अनेकवेळा मुलांना तो समजत नाही. बोजड, अवघड शब्दांचा मारा केला जातो. सहज सोपेपणा नसल्याने मुले नाराज होतात. अनेकवेळा शिक्षकांना फोन लावावा लागतो. मोबाईल पालकांसोबत असल्याने रात्री मुलांना अभ्यासक्रम पाहावा लागतो. अध्यापनातील प्रभावीपणा नाहीसा झाला आहे.येलूर (ता. शाहूवाडी)- गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांकडून सकाळी ८ ते साडेनऊ या कालावधीत विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते. अभ्यास टाकला जातो. सातत्य असल्यामुळे विद्यार्थीही अभ्यास करतात. मोबाईलवरून वाचन ऐकविले जाते. मात्र, अनेकवेळा मोबाईल रेंजची अडचण येते.
साळगाव (ता.आजरा)- व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शिक्षक अध्यापन करत असल्याचे चित्र आहे. परंतु विद्यार्थी या प्रक्रियेला कंटाळले आहेत. सुरुवातीचा उत्साह ओसरला असल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण पद्धत नीरस वाटत आहे.सांगरूळ (ता. करवीर) - कधी सकाळी तर कधी संध्याकाळी अध्यापन केले जाते. एकाच घरात दोन विद्यार्थी असतील आणि एकच मोबाईल असेल तर अडचण येते. रेंजचा प्रश्न असल्याने अध्यापन किंवा अध्ययनामध्ये सातत्य राहत नाही.या आहेत अडचणीअनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज नसणे, पालकांकडे स्मार्ट फोन नसणे, अनेक शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली गेल्याने ते अध्यापन करू शकत नाहीत. प्रत्यक्ष अध्यापनातील जिवंतपणा यामध्ये जाणवत नाही.
- शाळा १९७६
- विद्यार्थी १,६६,८०६
- शिक्षक ७९००
- ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा-१५३३
प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने शक्य त्या सर्व मार्गांनी विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते. यामध्ये अनेक शाळांनी प्रभावी उपक्रम राबवले आहेत. शिक्षण विभागाकडून आलेला दिशा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जातो. शिक्षक कोविड ड्युटी सांभाळून त्यांच्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. - आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. कोल्हापूर.