कोल्हापूर : प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.झोमॅटो आणि स्विगी या ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनीमार्फत प्लास्टिक पिशवीमधून खाद्यपदार्थ दिले जातात, अशी तक्रार आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आली होती. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना खात्री करुन संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डॉ. विजय पाटील यांनी प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकाला ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास सांगितले.संबंधित कंपनीकडून ही आॅर्डर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत आल्यावर पथकाने खाद्यपदार्र्थांची आॅर्डर तपासली असता ते खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशवीमधून आणल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे झोमॅटो आणि स्विगी या दोन्ही कंपन्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आणि दंडाची पावती संबंधितांना देण्यात आली.
याशिवाय ज्या हॉटेलमधून हे खाद्यपदार्थ मागविण्यात आले होते, त्या कोल्हापूर डायनिंग हॉटेललाही पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाई वेळी विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर आरोग्य निरीक्षक सुशांत शेवाळे, सुशांत कावडे, मनोज लोट व श्रीराज होळकर उपस्थित होते.