कोल्हापूर : विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या शिवाजी विद्यापीठाच्या लेखी परीक्षा या ऑफलाईऩ आणि ऑनलाईन या दोन्ही पर्यांयांच्या माध्यमातून दि. १ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. त्याला विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने सोमवारी मान्यता दिली. या परीक्षांतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी राहणार आहे. परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असणार आहे.राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याच्यादृष्टीने तयारी आणि परीक्षेचे स्वरूप ठरविण्यासाठी विद्या परिषदेची ऑनलाईन बैठक झाली. ज्या ठिकाणी शक्य तेथे ऑनलाईन, तर इंटरनेट, विजेची उपलब्ध नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालयांनी घ्यावयाच्या विद्यापीठाकडून केवळ त्यांना प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या आहेत. त्यांच्यासाठी ४० गुणांचा, तर प्रात्यक्षिक परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांचा पेपर असणार आहे.
ऑफलाईन पर्यायाने परीक्षा घेण्यासाठी विविध शाळांमध्ये परीक्षा केंद्र करण्यात येणार आहे. नियमित आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या निर्णयानुसार परीक्षा घेण्याची तयारी करण्यासाठी दोन समित्यांची नियुक्ती होणार आहे.
या समित्यांमध्ये अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, प्राचार्य, आदींचा समावेश असेल. या विद्यापरिषदेच्या बैठकीत प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, मेघा गुळवणी, एच. एन. मोरे, पंकज मेहता, आदींसह विद्या परिषदेतील ४० सदस्य सहभागी झाले.
विद्यापरिषदेच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष अथवा सत्राच्या परीक्षेबाबतच्या नियोजनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार प्रामुख्याने सदर परीक्षा ही युजीसीच्या, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे दि. १५ सप्टेंबर, तर लेखी परीक्षा दि. १ ऑक्टोबरपासून होणार आहे. तरी, विद्यार्थ्यांनी याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन करून परीक्षेची तयारी करावी.-डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव
संगणक प्रणाली घ्यावी लागणारऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यासाठी गुगल फॉर्मप्रमाणे काम करणारी संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) लागणार आहे. ती विद्यापीठाकडे सध्या नाही. ही प्रणाली स्वत: खरेदी करायची का, शासनाकडून मिळवायची याबाबत विद्यापीठाकडून दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.विद्यापीठ मागणार मुदतवाढया परीक्षेची प्रक्रिया दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. ही मुदत दि. १० नोव्हेंबरपर्यंत वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.आकडेवारी दृष्टिक्षेपात१) कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील एकूण महाविद्यालयांची संख्या : २९३२) अंतिम वर्षातील नियमित (फ्रेश) विद्यार्थी : ७५ हजार३) बॅकलॉगमधील विद्यार्थी : २५ हजार४) ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षा : ४७५५) या पध्दतीनुसार होणाऱ्या पेपरची संख्या : सुमारे १६००