समीर देशपांडेकोल्हापूर : बाळाचा पाळणा सजविला गेला. फुगे बांधले गेले. बाळाला छान कपडे घातले गेले. बाळाचे आई-बाबा, बाळाच्या बाबांचे मामा-मामी आणि शेजारचे संबंधित अशा मोजक्या आठ-नऊ जणांची उपस्थिती. ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ म्हटलं गेलं. बाळाच्या कानात कुर्रर्र करण्यात आलं आणि त्याचं ‘रुद्र’ नाव ठेवण्यात आलं. असा हा अनोखा ‘डिजिटल बारशा’चा कार्यक्रम रविवारी येथील प्रतिभानगरमध्ये हवामहल इमारतीमध्ये झाला आणि अमेरिका, लंडन, सिंगापूर, विटा, पुणे, नागपूर, जबलपूर, मुंबई येथील १२५ हून अधिक नातेवाइकांनी तो आॅनलाईन अनुभवलाही.
विटा मर्चंट्स बॅँँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांचे चिरंजीव डॉ. निखिल गुळवणी हे कोल्हापूर येथील एका रुग्णालयामध्ये कॅन्सर सर्जन आहेत. त्यांच्या पत्नी सायली याही डॉक्टर आहेत. त्यांना मुलगा झाल्यानंतर २४ मार्च रोजी त्यांनी मुलाचे बारसे करण्याचा निर्णय घेतला; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊनची वेळ आली आणि हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला.
अखेर डिजिटल पद्धतीने हे बारसे करण्याचा निर्णय घेतला गेला. रविवार, २६ मार्चचा दिवस ठरला. रात्री आठ ते नऊ ही वेळ ठरली. विट्यापासून लंडन, अमेरिकेपर्यंतच्या सर्व पाहुण्यांना ही वेळ कळविली गेली आणि झूम अॅपच्या ५० कनेक्शन्सच्या माध्यमातून हे सर्वजण आॅनलाईन आले. या सगळ्यांनी हा बारशाचा कार्यक्रम आॅनलाईन डोळे भरून पाहिला आणि बाळाला आशीर्वादही दिले. या बारशाच्या निमित्ताने गुळवणी कुटुंबीयांनी विटा येथील २५ कुटुंबांना शिधावाटपही केले. कोरोनामुळे झालेल्या डिजिटल बारशाची ही कहाणी...