पेठवडगाव : कर्मचारी सानुग्रह अनुदानप्रश्नी चुकीचा ठराव पालिकेने केला आहे. त्यामुळे प्रशासनाने पार्टी पाडण्याचा ठेका घेतला आहे काय? असा संतप्त सवाल करत कर्मचारीप्रश्नी बेकायदेशीर ठरावावर माफी मागा अन्यथा सभात्याग करतो, असे म्हणत नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांनी ऑनलाईन सभात्याग केला तर सातहून सदस्यांनी एकत्रित निर्णय घेताना ऑनलाईन सभेकडे पाठ फिरवली.
वडगाव पालिकेच्या ऑनलाईन सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. सभेत ठराव वाचून चर्चा किंवा विरोध न करता विषय मंजूर केले. बियर शॉपी, परमीट रूम सुरू करण्यास, दोघांना आधारकार्ड सेंटरसाठी ‘ना हरकत दाखला’ देणे, पाणी योजनेसाठी वॉटर मीटर दर आकारणी, अनधिकृत कनेक्शन शोधणे आदींसह १६ तर आयत्या वेळेच्या सहा विषयांवर चर्चा करून निर्णय झाले. विषयपत्रिकेचे वाचन कर निरीक्षक सुरेश भोपळे यांनी केले. प्रश्नोत्तराच्या तासाला एकच प्रश्न स्वीकृत नगरसेवक यादव यांनी केला. यामध्ये आंदोलन केलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान देऊ नये, असा ठराव पालिका सभेत झाल्याचे पत्र आंदोलक कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. या पत्रावर हरकत घेत यादव यांनी हा चुकीचा ठराव इतिवृत्तात घेण्यात आला आहे, असा आरोप केला. त्यानंतर अजय थोरात यांनी यावर मार्ग काढत पुढचे विषय घ्या, असे आवाहन केल्यानंतर पुढील विषयांचे वाचन करण्यात सर्व विषय मंजूर केले.
...........
गणपूर्ती पूर्ण होणार काय?
नगरसेवकांनी पाठ फिरविल्यामुळे प्रशासन व नगराध्यक्ष यांनी सभा तशीच पुढेच सुरू ठेवली. या सभेला नगरसेवकांची उपस्थितांची हजेरी व नोंद घेतली हे समजू शकले नाही. त्यामुळे सभेसाठी गणपूर्तीचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा होत आहे.