संतोष मिठारी
कोल्हापूर : पालकांची मागणी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षापासून मोबाइलची सवय लागल्याने काही मुले मोबाइल घेऊन शाळेत येत आहेत. त्यामुळे ऑफलाइन शाळेत अशी मुले ऑनलाइन असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा गेल्या दीड वर्षापासून ऑनलाइन सुरू होत्या. पण, विद्यार्थ्यांना नीट समजत नाही. त्यामुळे शाळा ऑफलाइन भरविण्यात याव्यात, अशी मागणी वारंवार पालकांकडून होऊ लागली. त्याची दखल घेत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या इयत्तांचे वर्ग ऑफलाइन सुरू झाले. या पद्धतीने शाळा सुरू झाल्या, तरी काही विद्यार्थी मोबाइल घेऊन वर्गात येत असल्याचे दिसून येत आहे.शाळेच्या वेळेत ऑनलाइन गेम खेळणे, स्टेट्स अपडेट करणे, आदी प्रकार या मुलांकडून होत आहेत. ते लक्षात आल्याने काही शाळांनी विद्यार्थ्यांनी मोबाइल घेऊन वर्गामध्ये येऊ नये, अशी सूचना केली आहे. पालकांनादेखील याबाबत कळविले आहे.
जिल्ह्यातील सुरू झालेल्या शाळा
जिल्हा परिषद ३५५५
शहरी २०९
म्हणून मुलांना लागतो मोबाइल
शाळा सुरू झाली असली तरीही विद्यार्थी वाहतूक सुरू नाही. त्यामुळे काही विद्यार्थी शाळेपर्यंत शेअर रिक्षा, सायकल किंवा चालत जाण्याचा पर्याय स्वीकारतात. शाळेत वेळेवर विद्यार्थी पोहोचला का? याची खात्री त्याच्याशी संपर्क साधल्याशिवाय होत नाही. म्हणून मुलांना मोबाइल लागत असल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.
मुलांची काळजी, म्हणून दिला मोबाइल
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने अजून थोडी भीती वाटते. त्यामुळे त्याच्या संपर्कात राहणे आवश्यक असल्याने शाळेत जाताना मुलीकडे मोबाइल देत आहे. - अनिल सोनार
वाहतूकव्यवस्था सुरळीत नसल्याने मुलगा शाळेत वेळेत पोहोचला का, नाही याची काळजी वाटते. त्यामुळे त्याच्याकडे मोबाइल दिला आहे. पण, वर्ग सुरू असताना त्याचा वापर करू नये अशी त्याला सूचना दिली आहे. - दिपाली खोत
शाळेत मोबाइल नकाेच
पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शाळा ऑफलाइन सुरू केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत मोबाइल घेऊन यायला नको. मोबाइल घेऊन आलेल्या मुलांचे शिक्षणाकडे लक्ष लागत नाही. - विवेक ठाकूर, मुख्याध्यापक, कळंबा-पाचगाव माध्यमिक विद्यालय
शाळा ऑफलाइन सुरू असल्या, तरी विद्यार्थ्यांना स्वाध्याय मोबाइलवर दिला जात आहे. त्यामुळे शाळेचे कारण पुढे करून मुले मोबाइल वापरत आहेत. शाळेच्या वेळेत त्यांच्या हातात मोबाइल नको. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक आजार, स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्या वाढत आहेत. ते पालकांनी गांभीर्याने लक्षात घ्यावे. - दत्ता पाटील, सचिव, मुख्याध्यापक संघ