लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने अध्यापनाची वेळ शाळांवर आली आहे. शिक्षण विभाग, शाळा व शाळा व्यवस्थापन समित्यांनी पूर्व नियोजनानुसार मंगळवारपासून ऑनलाईन शाळेस सुरुवात केली आहे.
तालुकास्तरावर मुख्याध्यापक, तसेच शाळा स्तरावरही शाळा व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन ऑनलाईन शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शाळा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. काही शिक्षक शाळेत येऊन, तर काही शिक्षकांनी घरातूनच ऑनलाईन शिक्षण दिले. अजूनही विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके मिळाले नाहीत. मागील इयत्तेतील जुनी पुस्तके घेऊन पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या मूलभूत गोष्टींचे शिक्षण देणे सुरू आहे. मंगळवारपासून ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने शिक्षकांची मात्र तारांबळ उडाली आहे.
चौकटी
ऑनलाईन पद्धतीत अनेक अडचणी
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देताना शिक्षक व पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकाच वेळी तास सुरू असल्यास घरातील अनेक मुलांना मोबाईल देणे शक्य होत नाही. कधी कधी नेटवर्कचा त्रास सहन करावा लागतो, तर काही विद्यार्थ्यांकडे अजूनही मोबाईल नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना अनेक प्रश्न सतावत आहेत.
काही उपाययोजना
ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांची यादी करून त्यांना अभ्यासक्रमाच्या माहितीची झेरॉक्स प्रत देण्यात येणार आहे. तसेच मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्याला मोबाईलची सुविधा असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्याचा उपाय सुचविण्यात आला आहे. तसेच व्हॉट्सअॅप ग्रुप करून त्याद्वारे सूचना दिल्या जात आहेत.