कोल्हापूर : मुलगा, मुलगी परदेशी. कोरोनामुळं दोन वर्षे ेहोत आली एकाचीही भेट नाही. सणावाराला गोडधोड केलं की हमखास डोळ्यात पाणी यायचं, अशा परिस्थिती मनीषा जोशी यांच्या पुढाकारानं ‘एनआरआय पेरेन्टस् असोसिएशन’ची स्थापना झाली आणि हे संघटन सर्वांना दिलासादायक ठरलं आहे. कोल्हापुरातील ज्यांची मुलं परदेशात आहेत असे १२७ पालक पंधरा दिवसांनी आणि यातील केवळ महिला दर बुधवारी ‘गुगल मीट’च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. ती आपल्या मुलामुलींशी ऑनलाईन संपर्क साधतातच. परंतु तितक्याच जिव्हाळ्यानं ते कोल्हापुरातील सहकाऱ्यांशीही बोलतात.
पाचगणी येथील एका प्रशिक्षण संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर रूईकर कॉलनी येथे राहणाऱ्या मनीषा जोशी आणि त्यांचे पती जगदीश जोशी पुन्हा कोल्हापुरात आले. त्यांची मुलगी ऑस्ट्रेलियात असते. त्यामुळे यांना सुरूवातीला घर खायला उठायचं, त्यांनी असा विचार केला की आपल्यासारख्या अनेकांची मुलं-मुली परदेशात आहेत. त्यांचीही अवस्था आपल्यासारखीच असते. तेव्हा या सर्वांना एकत्र आणलं तर त्याचा एकमेकांना फायदा होईल.
त्यांनी कोल्हापुरातील अशा पालकांशी संपर्क साधायला सुरूवात केली. शहरातील १२७ पालक आतापर्यंत एकत्र आले आहेत. कोरोनाची पहिली लाट येण्याआधी स्वयंसिद्धाच्या कांचन परूळेकर यांनी त्यांना संस्थेचे सभागृह उपलब्ध करून दिले. त्या ठिकाणी या संघटनेचे सहा कार्यक्रम झाले. आपली मुलं आपल्यासोबत नाहीत म्हणून हिरमोड करून घेण्यापेक्षा उर्वरित आयुष्य अधिक दर्जेदारपणानं कसं जगता येईल, असा विचार होवू लागला.
मग नोकरी व्यवसाच्या व्यापामुळं जे छंद जोपासता आले नाहीत त्याची नव्यानी उजळणी सुरू झाली. कागलजवळच्या ‘स्नेहबंध’ संस्थेकडे एक दिवसाची सहलही काढण्यात आली. अशा पद्धतीनं हे सर्वजण एकत्र येत आपल्या सुखदु:खाची देवाणघेवाण करतानाच कोरोना सुरू झाला आणि मग ‘ऑनलाईन’ संपर्क सुरू झाला.
चौकट
स्वनिर्मिती दिवस
या सर्व सदस्यांतील महिलांचा एक स्वतंत्र व्हॉट्सअॅप गट तयार करण्यात आला आहे. या समुहातील महिला दर बुधवारी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत ऑनलाईन गप्पा मारतात. तर सर्वांचा मिळून एक गट आहे. हे सर्वजण पंधरा दिवसातून एकदा स्वनिर्मिती दिवस ठरवतात आणि ऑनलाईन अनुभव, कविता, गाणी आणि मनाेगते व्यक्त केली जातात.
चौकट
ऑनलाईनपासून परदेशात साहित्य पाठवण्यापर्यंत शिकवणी यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना ‘ऑनलाईन संवाद’ हा प्रकार सुरूवातीला अडचणीचा वाटत होता. परंतु सगळ्यांनी एकमेकांना शिकवत शिकवत हा उत्तम असा प्रयोग सुरू आहे. परदेशात मुलांना साहित्य पाठवताना कोणते कुरियर विश्वासू आणि स्वस्त आहे या माहितीपासून ते दुसऱ्या सदस्याच्या घरातील नातू आला तरी त्याचा आनंद इतरांना होता, असा एक स्नेहभाव या सर्वांमध्ये तयार झाला आहे.
कोट
आमची मुलगी परदेशात. आम्ही दोघेच घरी. नातवंडांच्या आठवणी येतात. पण इलाज नसतो. लगेच उठून जाणंही शक्य नसतं. कोरोनामुळं तर आणखीन बंधन आली. आम्ही दोन वर्षांपूर्वी हे रोपटं लावलं. १८ जुलै रोजी या असाेसिएशनला दोन वर्षे होत आहेत. आमची मुलं जरी परदेशात असली तरी आम्ही एकमेकांचा आधार झालो आहोत.
जगदीश जोशी, मनीषा जोशी
संकल्पक, एनआरआय पेरेंट असाेसिएशन, कोल्हापूर
२९०६२०२१ कोल जगदीश जोशी