कोल्हापूर : कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत ४ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत कारखान्याच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सोमवारी दिली. शाहूची कुस्ती परंपरा जपत कुस्ती पंढरीत कारखान्याच्या बंदिस्त गोडाऊनमध्ये कोरोनाचे नियम पाळून ही स्पर्धा विनाप्रेक्षक घेतली जाईल,
घाटगे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून १९८४ साली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रासह कागल तालुक्यातील मर्यादित मॅटवरील कुस्ती सुरू केली. मल्लांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती सुरू केली. आतापर्यंत राष्ट्रकुल सुवर्ण विजेते राम सारंग, विक्रम कुराडे, रणजित नलावडे, कौतुक डाफळे, चंद्रहार पाटील, अमोल बुचडे, अस्लम काझी, शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर, मधुकर खामकर, विलास मोरे, धावपटू ज्योती जाधव, जयश्री बोरगी, पाॅवरलिफ्टर शुक्ला बिडकर, अमित निंबाळकर यांनी नाव उंचावले. हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी राज्य शासनाने कुस्ती स्पर्धांना परवानगी द्यावी, अन्यथा आम्हीही कलाकारांप्रमाणे उपोषणाला बसू. असा इशारा यानिमित्त दिला. महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे म्हणाले, ‘शाहू साखर’ सारखे राज्यातील इतर कारखान्यांनीही गोडाऊनमध्ये इनडोअर स्टेडियम करून सर्वत्र कुस्ती स्पर्धा घ्यावी. या स्पर्धेकडे महाराष्ट्र केसरी स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बघावे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक बाॅबी माने, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, उपमहाराष्ट्र केसरी अमृता भोसले, रामा माने, महेश वरुटे, नंदु आबदार, सचिन खोत, सृष्टी भोसले, अनुष्का भाट, माधुरी चव्हाण आदी मानधनधारक मल्ल उपस्थित होते.
अशी होईल स्पर्धा
विविध ३१ गट
१४ व १६ वर्षांखालील कुमार गट : आठ गट
१९ वर्षांखालील कनिष्ठ आणि वरिष्ठ ग : प्रत्येकी पाच गट
महिलांकरिता ४४, ५५ व ६५ किलो गट