चेन्नई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर द्रमुक पक्षाच्या काही नेत्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. यात एम. के. स्टॅलिन यांची कन्या व जावई सबरीसन यांच्या घरासह त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा समावेश आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात फारसे काही हाती लागले नाही. शुक्रवारी दिवसभर शोधमोहीम राबविल्यानंतर आयकर विभागाला सबरीसन यांच्याकडे फक्त १ लाख ३६ हजार रुपये सापडल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील चार ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले होते.
चेन्नई येथील निलनगराई भागातील स्टॅलिन यांचे जावई आणि मुख्य सल्लागार सबरीसन यांच्या घरी २५ आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. त्याचप्रमाणे त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर तीन व्यक्तींच्या घरावर देखील छापे टाकण्यात आले होते. या छाप्यामध्ये फक्त १ लाख ३६ हजार रुपये सापडले. हे पैसे देखील घरखर्चासाठी आणलेले होते. मतदारांना वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे आणल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्याच्याआधारे हे छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयकर विभागाच्या या कारवाईनंतर द्रमुक पक्षाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सहा एप्रिलला तामिळ जनता चुकीच्या पद्धतीला मतदानातून उत्तर देईल. मी आणीबाणी, मीसासारखी स्थिती पाहिली आहे. त्यामुळे असल्या छाप्यांना मी घाबरत नाही, असे उत्तर स्टॅलिन यांनी एका प्रचार सभेत दिले आहे. माझ्या बहिणीच्या घरावर छापे टाकण्यापेक्षा माझ्या घरी या. मी कलाईगार यांचा नातू आहे. अशा छाप्यांना अजिबात घाबरत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयानिधी स्टॅलिन यांनी दिली आहे, तर राजकीय प्रेरणेतून हे छापे टाकले जात असून केंद्रातील भाजप सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.