कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत एस. टी. सेवा पुन्हा सुरू झाली. नागरिकांनी प्रवास करणे टाळल्याने रविवारी दुपारपर्यंत फक्त १०२ प्रवाशांनी एस.टी.ने प्रवास केला. काही मार्गांवर प्रवासीच नसल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली.कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली एस.टी. पुन्हा एकदा रस्त्यांवर दिसू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा अंतर्गत एस.टी. बससेवा सुरू झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने या बससेवेसाठी काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून), प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करूनच एस.टी. धावत आहे.इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर अधिक प्रवासीइचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर सर्वाधिक म्हणजे ३५ प्रवाशांनी प्रवास केला. कागल-रंकाळा, कागल-हुपरी यांसह जयसिंगपूर, रंकाळा-हुपरी, मलकापूर, गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर वाहतूक सुरू होती. मात्र या गाड्यांनाही अल्प प्रतिसाद मिळाला. राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, गारगोटी या आगारांतून एकही गाडी बाहेर पडली नाही.