राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीत केवळ १०४४ (१३ टक्के) महिलांचा समावेश आहे. प्रक्रिया संस्था गटात कोल्हापूर शहरासह चार तालुक्यात एकही मतदार नाहीत. सर्वाधिक महिला मतदार हातकणंगले तालुक्यात १६३ आहेत.
जिल्हा बँकेची प्रारूप यादी विभागीय सहनिबंधकांनी शुक्रवारी प्रसिध्द केली. चार गटात ७६४७ मतदार असून सर्वाधिक ४१११ मतदार दूध, औद्योगिक, मजूर, ग्राहक संस्था गटात आहेत. या गटात महिला मतदारांची संख्या ७५९ आहे. या गटात दूध संस्थांचा समावेश होत असल्याने ही संख्या चांगली आहे. विकास संस्था गटात १८६६ मतदार आहेत, त्यापैकी १६८ महिला असून कागल, पन्हाळा व राधानगरी वगळता इतर तालुक्यात सारखीच संख्या आहे.
विकास संस्था गटात आमदार विनय काेरे यांच्या नावावर ‘आनंदराव जाधव-बहिरेवाडी’, ‘जाखले’, ‘तात्यासाहेब कोरे-बहिरेवाडी’, धर्मराज कळे, रामलिंग म्हाळुंगे, विघ्नहर्ता कोडोली या संस्थांचे ठराव नावावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावावर विकास संस्था गटात ‘गहिनाथ-कागल’, पांडुरंग-करनूर’, ‘संभाजी-कागल’ या संस्थांचे ठराव आहेत. खासदार संजय मंडलिक यांच्या नावावर मुरगूड येथील विकास संस्थेसह प्रक्रिया संस्था गटातून दोन ठराव आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक, ‘गोकूळ’चे संचाल नविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, अमित ए. पाटील, युध्दवीर व रणवीर गायकवाड, संदीप नरके आदी वारसदारही यादीत आहेत.
बहुतांशी मतदार ५० च्या पुढील
जिल्हा बँकेचे बहुतांशी मतदार हे ५० वर्षाच्या पुढील आहेत. बँकेच्या राजकारणावर पकड राहण्यासाठी अपवाद वगळता पारंपरिक मतदारच यादीत दिसत आहेत. ‘गोकूळ’च्या मतदार यादीत २६ टक्के चाळिशीच्या आतील मतदार होते.
कागल तालुक्यातील सर्वाधिक संस्था अपात्र
प्रारूप यादी करताना अवसायनातील, नोंदणी रद्द, थकबाकीदार, प्रशासक आदी बाबींची चाळण लावली होती. यामध्ये ३९५० संस्था मतदानास अपात्र ठरल्या. सर्वाधिक २२६ संस्था कागल तालुक्यातून असून यामध्ये १६८ संस्था अवसायनातील आहेत. हातकणंगले तालुक्यातील १२६ तर कोल्हापूर शहरातील १०७ संस्था अपात्र ठरल्या आहेत.
(बातमीचा जोड देत आहे.....महत्त्वाचा आहे.....)