लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला आवकेवर झाला आहे. रविवारी एकूण आवकेच्या १० टक्के भाजीपाल्याची आवक झाली आहे. लॉकडाऊनमधून भाजीपाल्याला वगळले असले तरी शेतकऱ्यांनी दोन दिवस भाजीपालाच समितीकडे पाठवलेला नाही. ‘गोकूळ’ची एक लाख लीटर दूध विक्री ठप्प झाली आहे.
शनिवारपासून दोन दिवसाचा लॉकडाऊन सुरू होता, यातून भाजीपाला, दूध, फळ विक्रीला वगळले आहे. तरीही शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला बाजार समितीकडे पाठवलेला नाही. साधारणत: कोल्हापूर बाजार समितीकडे रोज अडीच हजार क्विंटल भाजीपाला येतो. त्याची विक्री कोल्हापूरसह कोकणात होते. शनिवारी २५ टक्केच आवक झाली होती, रविवारी तर ही आवक १० टक्क्यावर आली. कोबी, वांगी, टोमॅटो, गवार, भेंडी व दुधी भोपळा इतक्याच सहा भाज्यांची दोनशे क्विंटल आवक झाली. भाज्यांच्या आवकेबरोबरच उठावही होत नाही. लॉकडाऊनमधून भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्यासह शेतीमाल वगळला आहे, तरीही दोन दिवस आवक कमी झाली. आजपासून शेतकऱ्यांनी नियमितपणे शेतीमाल आणावा व व्यापाऱ्यांनीही सौद्यात सहभागी व्हावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी केले.
लॉकडाऊनमुळे हॉटेल, चहाच्या टपऱ्या बंद असल्याने दुधाची मागणी कमी झाली आहे. ‘गोकूळ’ दूध संघाचे रोज मुंबई व पुण्यात साडेसात लाख लीटर दूध विक्री होते. त्याचबरोबर कोल्हापूर शहरात दीड लाख लीटर दूध जाते. लाॅकडाऊनमुळे रविवारी सुमारे एक लाख लीटर दूध विक्रीवर परिणाम झाल्याने लाखो रुपयांचा फटका ‘गोकूळ’ला बसला.
आजपासून सुरळीत होण्याची अपेक्षा
आज, सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल होत असल्याने भाजीपाला व दूध विक्री सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार शेतकरी व व्यापाऱ्यांनी नियोजन केले आहे.