राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे, राशिवडे, राधानगरी, धामोड, कसबा तारळे, सरवडे, पालकरवाडी यांसह इतर १२ गावांत रोज रुग्ण वाढत आहेत. बहुतेक मोठ्या गावात आठवीपासून वर्ग आहेत. तालुक्यात लहान-मोठ्या गावांमध्ये रुग्णांचे प्रमाण कायम आहे. शिवाय वाड्या-वस्त्यामधील विद्यार्थी रुग्ण असलेल्या गावातच इयत्ता आठवीपासूनचे शिक्षणासाठी येतात. त्यामुळे राधानगरी तालुक्यात उद्यापासून शाळा सुरू होण्याच्या शक्यता धूसर आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी सर्वस्तरातून शाळा सुरू होण्याबाबत विचारणा होत आहे. मात्र, शासनाने सावध पवित्रा घेत जेथे रुग्ण नाहीत, अशा कोरोनामुक्त गावांमध्ये नियम पाळत शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, परिसरातील रुग्णसंख्या, कोविड काळजी केंद्र यासाठी दिलेल्या इमारती, जिथे रुग्णवाढ अधिक आहे, अशा गावांमध्ये केलेला चौदा दिवसांचा लॉकडाऊन यामध्ये शिक्षण प्रक्रिया रखडली आहे.