कोल्हापूर : विधानपरिषदेची काँग्रेस पक्षाची उमेदवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना जवळपास निश्चित झाली असून काँग्रेसअंतर्गत बंडखोरी टाळण्यासाठीच इच्छुकांना मुंबईला बोलावले आहे. पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याने विरोधी गटाकडून त्यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरायचे, याबाबत खलबते सुरू झाली असून त्यातून नगरसेवक सत्यजित कदम यांचे नाव शुक्रवारी पुढे आले आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवरून शह काट-शहाचे राजकारण सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष काँग्रेसबरोबर ‘राष्ट्रवादी’राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ काँग्रेसच्या बरोबरीने असल्याने त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस जो उमेदवार देईल त्याच्याबरोबर राहण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने दिले असले तरी आमदार हसन मुश्रीफ हे कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे सर्वश्रूत आहे. त्यामुळेच सतेज पाटील यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.अशोक चव्हाण यांच्यापुढेही उमेदवारीवरुन पेच आहे. उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसची असली तरी गेल्या चार-पाच दिवसांतील काँग्रेसअंतर्गत हालचाली पाहता उमेदवारीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी परदेशातून आल्यानंतर सोमवारीच उमेदवारीची घोषणा होणार आहे.काँग्रेस उमेदवारीचे संकेत मिळाल्यानंतर विरोधी गटाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली. सतेज पाटील यांच्या विरोधात आमदार महादेवराव महाडिक स्वत: उभे राहणार नाहीत. त्यांचे सुपूत्र स्वरूप महाडिक हे महापालिका निवडणुकीपासून सक्रिय राजकारणात आले. पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करणे तसे जोखमीचे आहे. त्यामुळे स्वरूप यांच्या राजकारणाची सुरुवात अशी नको, असे काहींचे मत आहे. त्यामुळे इतर पर्याय शोधले जात आहेत. राजेंद्र पाटील हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. सतेज पाटील यांच्याविरोधात ते बंडखोरी करू शकतील का? याची चाचपणी विरोधी गटाकडून सुरू आहे. अंतर्गत नाराजीमुळे काँग्रेसच्या मतांत फुटाफुटी होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी राष्ट्रवादी एकसंध राहिली तर सतेज पाटील हे सहज विजयी होऊ शकतात. त्यामुळेच राष्ट्रवादीमध्ये कोण बंडखोरी करू शकेल. त्यात हातकणंगले व शिरोळ तालुक्यात सर्वाधिक १४६ मतदान असल्याने राजेंद्र पाटील यांचे नाव पुढे आले; पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आदेश दिले तरच आपण रिंगणात उतरू, अशी भूमिका पाटील यांनी घेतल्याने विरोधी गटाकडून दुसऱ्या नावाची चाचपणी सुरू झाली. आमदार महाडिक अथवा त्यांच्या घरातील कोणी रिंगणात उतरण्याची शक्यता धूसर असल्याने सत्यजित कदम यांचे नाव पुढे आले आहे. कदम यांना पुढे करून सगळी ताकद त्यांच्या मागे लावण्याची व्यूहरचना आखली जात आहे.
सतेज पाटील यांनाच काँग्रेसची उमेदवारी शक्य
By admin | Published: December 05, 2015 12:49 AM