चंद्रकांत कित्तुरे --कोल्हापूर -भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना रात्री घराबाहेर पडणे मुश्कील करून सोडले असताना त्यांना आवर घालण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची प्रशासकीय यंत्रणा याबाबत उदासीन दिसते. एखाद्या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला झाला की, त्यावेळेपुरती चर्चा होते. उपाययोजना केल्या पाहिजेत, असे सर्वच म्हणतात; पण अंमलबजावणीच्या पातळीवर सारे काही शांत शांतच असते. काही दिवसांनी लोकही ही घटना विसरून जातात. परिणामी, भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच राहते. कुत्रा हा इमानी प्राणी मानला जातो. हौस म्हणून नव्हे, तर घरादाराच्या संरक्षणासाठी कुत्रा पाळला जातो. शहरी भागात हौसेखातर वेगवेगळ्या जातींची कुत्री पाळली जातात. त्यांची देखभालही मालकांकडून केली जाते. त्यांना अॅन्टी रेबिजच्या लसीही दिल्या जातात. त्यामुळे ती सहसा पिसाळत नाहीत. त्यांच्यापासून धोका कमी असतो. गावठी मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांपासून हा धोका जास्त असतो. कारण त्यांचे लसीकरण होत नाही. कुणी भाकरी दिली तर खायची, नाही तर कचरा कोंडाळ्यातले खाऊन ही कुत्री जगत असतात. अशा मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिवसा तसेच रात्रीही चौकाचौकांत बसलेल्या किंवा फिरताना दिसतात. अशा कुत्र्यांमधीलच एखादे कुत्रे पिसाळण्याची शक्यता अधिक असते. अस्वछ खाणे, अस्वच्छ वातावरणात राहणे, यामुळे हवेतील रेबिजचे विषाणू यातील एखाद्या कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करतात. ते त्याच्या लाळेमध्ये असतात. हा कुत्रा एखाद्या माणसाला किंवा जनावराला चावला की त्याच्या लाळेमधून या रोगाचा प्रसार त्याने ज्याला चावले आहे त्याच्या शरीरात होतो. अन् त्यालाही रेबिज रोगाची लागण होते. या प्राण्याच्या लाळेचा संसर्ग इतरांना झाला तर त्यांनाही या रेबिजची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. कुत्र्यांच्या झुंडी असतात कुठे? मोकाट किंवा भटकी कुत्री कचरा कोंडाळ्याबरोबरच मटण, चिकनची दुकाने, चायनिजची दुकाने, कत्तलखाने परिसरातही जादा आढळतात. अलीकडे चायनिज पदार्थ खाण्याचे वेड भलतेच वाढले आहे. त्यामुळे चौकाचौकांत चायनिजचे गाडे दिसतात. या गाड्यांवर तयार होणारा ओला कचरा जवळच कुठेतरी कचऱ्याच्या कोंडाळ्यात किंवा गटारीच्या कडेला टाकला जातो. मोकाट कुत्री त्यावर तुटून पडतात. मांसाहारामुळे ती अधिकच आक्रमक बनतात. मोकाट कुत्र्यांना ठार मारण्यावर बंदी मग या कुत्र्यांना रोखायचे कसे? तर त्यांचे निर्बिजीकरण करणे किंवा त्यांच्यावर संतंती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करणे आणि त्यांची पैदास वाढू न देणे हाच त्यावर जालीम उपाय आहे. कारण प्राणी संरक्षण कायद्यानुसार मोकाट कुत्र्यांना ठार मारता येत नाही. त्यामुळे हा उपाय योजन्यात येतो. अनेक महापालिका क्षेत्रात तो अवलंबिला गेला आहे. 5500 कुत्र्यांवर २००९ मध्ये कोल्हापुरात शस्त्रक्रिया करण्यात आली होती संख्या का वाढते? कोल्हापुरात २00८-२00९ मध्ये महापालिकेने कऱ्हाड येथील एका संस्थेमार्फत कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबविली होती. त्यावेळी सुमारे ५५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक (पशुवैद्यकीय) डॉ. विजय पाटील यांनी सांगितले. त्यानंतर मात्र अद्याप ही मोहीम राबविण्यात आलेली नाही. सांगलीतही २0११-१२ मध्ये ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर ती राबविलेली नाही. वाचकांना आवाहन ! मोकाट कुत्र्यांचा हा प्रश्न खूपच गंभीर आहे. अनेकजण त्यांचे लक्ष्य बनले असतील. काय आहेत तुमचे अनुभव? काय करता येईल या कुत्र्यांना आवरण्यासाठी? लिहा आणि पाठवा आमच्याकडे. निवडक पत्रांना प्रसिध्दी देऊ. आमचा पत्ता : लोकमत ,लोकमत भवन प्लॉट नं. डी-३७,४८ व ४८/१ शिरोली एमआयडीसी, पुणे-बंगलोर रोड, कोल्हापूर, ४१६१२२.इमेल- ‘ङ्म’ीि२‘@ॅें्र’.ूङ्मे
कुत्र्यांच्या हल्ल्यांनंतर उपायांवर केवळ चर्चा
By admin | Published: June 21, 2016 10:37 PM