लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकरी जगला तरच देश टिकेल, सीमावासीयांच्या वेदना महाराष्ट्राला कधी कळणार, कन्या वाचवूया, वर्षानुवर्षे न्यायाची प्रतीक्षा, मराठा स्वराज्य भवन झालेच पाहिजे, अशा ज्वलंत प्रश्नांवर लक्ष वेधणारे फलक, झांज, लेझीम पथक, मर्दानी खेळ, शिव-शाहू, छत्रपती ताराराणी, मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयचा गजर करीत मंगळवारी शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळा संपन्न झाला.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व महापौर हसिना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणीकर, प्रकाश मरगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शिवराज्याभिषेक हा लोकोत्सव होत असल्याचे नमूद करून या दिवसाचे महत्त्व विषद केले. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच रिक्षांवर सध्याच्या सामाजिक व राजकीय प्रश्नांवर लावलेले डिजिटल फलक लक्ष वेधून घेत होते. स्त्रीभ्रूण हत्या, शिवाजी महाराजांची जलनीती, पर्यावरण रक्षणाचे आज्ञापत्र, न्यायव्यवस्था विषद करीत आपण किती वर्षे याची प्रतीक्षा करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. सध्या शेतकऱ्यांच्या संपाने महाराष्ट्र ढवळून निघालेला असताना शेतकरी जगला तरच देश टिकेल, याची जाणीव करून देण्यात आली. कित्येक वर्षे सुरू असलेल्या सीमालढ्याच्या प्रश्नाला हात घालत सीमावासीयांच्या वेदना महाराष्ट्राला क धी कळणार, असा सवाल विचारण्यात आला. पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला आणि मुली शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत होत्या. मागील बाजूस घोड्यावर शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी, शाहू महाराज, मावळे यांच्या वेशभूषेत लहान मुले स्वार झाली होती. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध मंडळांच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व फुलांच्या पायघड्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले जात होते. मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी चौक या मार्गावरून मिरवणूक पार पडली. यावेळी पंडितराव सडोलीकर, कादर मलबारी, अशोकराव माळी, अजय चौगुले, शशिकांत पाटील, डॉ. संदीप पाटील, अनंत म्हाळुंगेकर, प्रा. वसंतराव मोरे, भगवान काटे, तौफिक मुजावर, अवधूत पाटील, अरुण कुऱ्हाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.झांज, लेझीम, मर्दानी खेळ या मिरवणुकीत खंडोबा वेताळ मर्दानी खेळाचा आखाडा, श्रीपंत अवधूत मर्दानी आखाडा, जयभवानी झांजपथक व ढोलपथक असंडोली, या विविध संस्थांनी उत्साहाचे रंग भरले. वाद्यांचा गजर आणि लहान मुला-मुलींची मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हा सोहळा साठवून ठेवण्यासाठी अनेकांना मोबाईलवर छायाचित्रे व शूटिंग घेण्याचा मोह आवरला नाही. भगव्या साड्या, टोप्या, फेटे मिरवणुकीत सर्व महिलांनी भगव्या साड्या आणि फेटे घातले होते. पुरुष मंडळीही पारंपरिक वेशभूषेत व मराठा स्वराज्य भवन लिहिलेल्या टोप्या घालून सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे परिसर भगव्या रंगाने व्यापून गेला होता. ‘शिवाजी महाराज की जय’चा घोष शिवराज्याभिषेक दिन उत्साहात लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक, प्रतिमेचे पूजन, वाद्यांचा गजर आणि जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषात मंगळवारी कोल्हापुरातील विविध पक्ष, संस्था, संघटना यांच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळ मंगळवार पेठ, खासबाग परिसरातील श्री राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक संपन्न झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतषबाजी करून शिवरायांचा जयघोष केला. त्यानंतर प्रसाद वाटप केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष विवेक कोरडे, सचिव विलास गौड, खजानिस किशोर भोसले, राजू काटे, अनिल गौड, राजू गौड, बबन कांबळे, सुधाकर जाधव व नागरिक उपस्थित होते. हिंदू महासभा हिंदू महासभेतर्फे छत्रपती संभाजी चौक येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सुवर्णा पोवार, सरोज फडके, दीपाली खाडे, ललिता जाधव, रेखा दुधाणे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी राज्य संघटक संजय कुलकर्णी, राजेंद्र शिंदे, नंदकुमार घोरपडे, सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. लाटवडे येथे दुग्धाभिषेक कोल्हापूर : लाटवडे (ता. हातकणंगले) येथे उभारलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुतळा समितीचे अध्यक्ष शरद पाटील यांच्या हस्ते दुग्धाभिषेक केला. पाटील यांनी वैयक्तिक कर्ज काढून तो पुतळा पूर्णत्वास नेला आहे. यासाठी अस्लम मुल्ला, बंडा यादव, धुळाप्पा कोळी यांनी सहकार्य केले.शिवसेनाशिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छ. शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी महिलांच्या लेझीमपथकाचे प्रात्यक्षिक झाले. यानंतर भव्य आतषबाजी केली. यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, माजी उपमहापौर उदय पवार, ज्येष्ठ शिवसैनिक दीपक गौड, हिंदू जनजागृतीचे मधुकर नाझरे, बजरंग दलाचे बंडा साळुंखे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष किशोर घाटगे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हरुगले, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रमेश खाडे, रणजित जाधव, पूजा भोर, गौरी माळदकर, अजित गायकवाड, आदी उपस्थित होते.
शेतकरी जगला तरच देश टिकेल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 1:02 AM