कोल्हापूर : ‘ही दोस्ती तुटायची नाय’, ‘मैत्रीचं नातं कसं जगावेगळं असतं, रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं’,‘भूतां परस्परें जडो, मैत्र जीवांचे’, ‘हॅप्पी फ्रेंडशिप डे’, अशा संदेशांची देवाण-घेवाण करत ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून तरुणाईने रविवारी मैत्रीचे बंध घट्ट केले. सामाजिक उपक्रमांतून तरुणाईने ‘फ्रेंडशिप डे’ला विधायकतेची किनार लावली. सुटीचा दिवस आणि पावसाने उघडीप दिल्याने तरुणाईने धम्माल केली.शहरातील न्यू कॉलेजवगळता अन्य महाविद्यालयांना सुटी असल्याने त्यांचा परिसर शांत होता. युवक-युवतींनी रंकाळा, भवानी मंडप, कॅफे हाऊस, रेस्टॉरंट, विविध बगीचांमध्ये भेटून एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचे बंध घट्ट केले. काहींनी एकमेकांना फोटो फ्रेम, किचेन, गुलाब, कॉफी मग, टी-शर्ट अशा भेटवस्तू दिल्या. काही शहराबाहेर फिरायला गेले होते. शालेय विद्यार्थ्यांनीही आपली कॉलनी, अपार्टमेंट, गल्लीमधील मित्र-मैत्रिणींना बँड बांधल्या. खासगी क्लास, हॉटेलबाहेर काही युवक, युवतींचा गप्पांचा फड रंगला. काहींनी महाविद्यालयाचे दिवस संपल्यानंतर काहीजणांनी एकत्र येऊन मैत्रीदिन साजरा केला.दरम्यान, विधायक उपक्रमांमध्ये वाय. डी. माने इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमधील सांस्कृतिक विभागाने ‘फ्रेंडशिप वुईथ ट्रीज’ ही संकल्पना राबविली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील ५० हून अधिक झाडांना फ्रेंडशिप बँड बांधून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी संस्थेचे संचालक बिपीन माने, अधिष्ठाता शिल्पा पाटील, प्राचार्य दिग्विजय पवार, प्रा. रोहन वर्पे, सुजाता सोलापुरे, अश्विनी बन्ने, आदी उपस्थित होते.सोशल मीडियावर आनंदोत्सवमैत्रीविषयक मराठी, हिंदी, इंग्रजी अशा संदेशांची रविवारी सकाळपासून व्हॉटस्अॅप, फेसबुक, आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून देवाण-घेवाण सुरू होती. बँड बांधल्यानंतर एकत्रितपणे सेल्फी घेऊन तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत होता. वर्ग, कामाच्या ठिकाणच्या मित्रांसमवेतची छायाचित्रे, मैत्रविषयक संदेश, व्हिडीओ, गाणी अनेकांच्या व्हॉटस्अॅप स्टेटस्वर झळकली होती.‘राजाराम’च्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधीलकीराजाराम महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी बालकल्याण संकुलातील मुलांसमवेत मैत्रीदिन साजरा केला. या विद्यार्थ्यांनी मुलांना दैनंदिन उपयोगाच्या साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासली. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनार, वसतिगृह अधीक्षक प्रा. विश्वनाथ बिटे यांचे मार्गदर्शन लाभले.निर्व्यसनी, भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प : युवासेना आणि नो मर्सी ग्रुपतर्फे आयोजित ‘मैत्री युवा’महोत्सवात तरुणाईने निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर रॉक बँड डान्स ग्रुपच्या नृत्य अविष्काराचा आनंद लुटत जल्लोष केला.
ही दोस्ती तुटायची नाय...‘फ्रेंडशिप डे’ला धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:40 AM