राम मगदूम।
गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन शासनाची थकहमी व अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यासाठी सहकार्य केले तरच गडहिंग्लज साखर कारखान्याची वाट सुकर होणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या सभासद, शेतकरी व कामगारांचे डोळे मंत्र्यांच्या भूमिकेकडे लागले आहेत.
सलग दोन वर्षे बंद असणारा आजरा साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी मंत्री मुश्रीफ व पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. यामुळेच जिल्हा बँकेच्या थकीत कर्जातून मुक्त होण्यास आजरा कारखान्याला मदत झाली.
तद्वत नवे कर्ज मिळून कारखाना सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला. म्हणूनच या कर्तबगार मंत्र्यांच्या भूमिकेकडे गडहिंग्लजकरही आशेने पाहत आहेत.
८ वर्षापूर्वी आर्थिक अरिष्टात सापडल्यामुळेच गडहिंग्लज कारखाना ब्रिस्क कंपनीला चालवायला देण्याची वेळ आली होती. त्यावेळीदेखील गडहिंग्लजचे लोकप्रतिनिधी म्हणून मुश्रीफ यांनीच पुढाकार घेतला होता. परंतु, आर्थिक तोटा व पोषक वातावरण नसल्याच्या कारणावरून कंपनीने याचवर्षी कारखाना सोडला आहे.
दरम्यान, 'ब्रिस्क'ने कारखाना सोडल्यानंतर कारखाना स्व:बळावर चालविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. परंतु, शासनाकडून थकहमी मिळाल्याशिवाय कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळणे अवघड आहे. म्हणूनच यंदाचा हंगाम सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे? हाच प्रश्न संचालकांना भेडसावत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठीच मंत्र्यांचे पाठबळ आवश्यक आहे.
चौकट :
मंत्र्याची आघाडीच सत्तेवर..!
सध्या गडहिंग्लज कारखान्यावर मंत्री मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राष्ट्रवादी-काँग्रेस व जनता दल' प्रणित शेतकरी आघाडी सत्तेवर आहे. त्यामुळे कारखाना आणि कंपनी यांच्यातील 'येणी-देणी'च्या वादावर मार्ग काढण्याबरोबरच कारखाना सुरू राहण्यासाठी मंत्रिद्वय नक्कीच मदत करतील, अशी आशा शेतकरी व कामगारांना आहे.
तांत्रिक सहकार्य उपलब्ध
'नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग'चे अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी मशिनरीच्या दुरूस्ती व देखभालीसाठी नॅशनल हेव्हीकडून तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून दिले आहे.
चौकट :
आर्थिक पाठबळाची गरज
सध्या कारखान्यावर कोणतेही कर्ज नाही. नक्तमूल्य उणे असल्यामुळे कर्ज मिळण्यासाठी शासनाच्या थकहमीची गरज आहे. त्यासाठी आणि राज्य सहकारी बँक व जिल्हा बँकेच्या अर्थसाहाय्यासाठी विद्यमान अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी मंत्र्यांना साकडे घातले आहे. जि. प. माजी उपाध्यक्ष व संचालक सतीश पाटील, प्रकाश पताडे, अमर चव्हाण व बाळकृष्ण परीट यांनी मुंबईला जावून मंत्री मुश्रीफ व राज्य बँकेच्या अधिका-यांशी चर्चाही केली आहे.
गडहिंग्लज साखर कारखाना : ३००६२०२१-गड-०८