कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात नॅक मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या डागडुजी, रंगरंगोटीची कामे निविदेप्रमाणे होत नसल्याचा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कोल्हापूर शाखेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या निविदेनुसार विद्यापीठातील कामे झाली, तरच ठेकेदाराचे बिल द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ़ डी. टी. शिर्के यांना दिले आहे.
विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभाग, मानव्यशास्त्र इमारत, आदींची डागडुजी, रंगरंगोटी करण्यात येत आहे. या कामांमध्ये निविदेतील अटी, शर्तींचा भंग झाला आहे. याबाबतचा भोंगळ कारभार विद्यापीठ प्रशासनाने वेळीच थांबवावा. विद्यार्थ्यांच्या पैशांचा होणारा अपव्यय थांबविण्यात यावा. याप्रकरणी संबंधितांवर दि. १० मार्चपूर्वी योग्य कारवाई करावी, अन्यथा विभागप्रमुख, विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाव्दारे मनविसेचे शहराध्यक्ष मंदार पाटील, ऋतुराज माने यांनी बुधवारी दिला. त्यांनी या निवेदनाव्दारे रंगरंगोटीचे काम निविदेप्रमाणे झाली नसल्याबाबतचा पुरावा म्हणून काही छायाचित्रेही दिली आहेत.
फोटो (०३०३२०२१-कोल-विद्यापीठ फोटो) : शिवाजी विद्यापीठात नॅक मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली काही इमारतींची डागडुजी, रंगरंगोटीची कामे निविदेनुसार झाली नसल्याचा आक्षेप ‘मनविसे’ने घेतला आहे.