कोल्हापूर : मानवता, समता हाच खरा धर्म आहे. अनेक राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. येथे संघर्षापेक्षा सहकार्याची गरज आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञानच जगाला तारू शकते. हे तत्वज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी मंगळवारी येथे केले.
येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात श्रीपतराव बोंद्रेदादा व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे स्वराज्य जननी जिजाऊ व जगज्जेते स्वामी विवेकानंद या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ, संस्कारपीठ म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब होत्या. युद्ध नको बुद्ध हवा, संघर्षापेक्षा सहकार्यातून विश्वबंधूता वाढवूया हा विचार स्वामी विवेकानंदानी मांडला. राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या तरुणांनी आत्मसात करावेत, असे डॉ. कोकाटे यांनी सांगितले.
जिजाऊ शिवरायांचे संस्कारपीठ होते. स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांना प्रेरणादायी आहेत, असे प्राचार्य डॉ. शानेदिवाण यांनी सांगितले. या व्याख्यानाच्या प्रारंभी जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन विद्यार्थिनींच्या हस्ते झाले. यावेळी रवींद्र भोसले, मनीष भोसले, गोपाळ गावडे, शरद गायकवाड, विठ्ठल आंबले, निवास कुंभार आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश शिखरे यांनी प्रास्ताविक केले. विजय देठे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी जाधव यांनी आभार मानले.
चौकट
भित्तीपत्रक, ग्रंथप्रदर्शन
यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन डॉ. कोकाटे यांनी केले. ग्रंथप्रदर्शनास त्यांनी भेट दिली.
फोटो (१२०१२०२१-कोल-श्रीमंत कोकाटे (शहाजी कॉलेज) : कोल्हापुरात मंगळवारी शहाजी महाविद्यालयात ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले. यावेळी शेजारी रवींद्र भोसले, आर. के. शानेदिवाण, मनीष भोसले, विठ्ठल आंबले, निवास कुंभार आदी उपस्थित होते.