लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संसदेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे आता निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. मात्र ते आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, ती करावी, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी केले.
शाहू छत्रपती म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार परवा भेटले, त्यांनीही राज्य सरकारच्या पातळीवरील प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकार आपल्यासोबत आहे, याबाबत आपणाला शंका वाटत नाही. तरीही मराठा आरक्षणासाठी खूप लढाई झाली, आता महाराष्ट्राने एकजुटीने पुढे गेले पाहिजे. पुनर्विचार याचिका दाखल करायला हरकत नाही, मात्र ही प्रक्रिया दीर्घ काळ आहे, त्यातून यश मिळेल असे नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
कोणाचे आरक्षण कमी करून आम्हाला नको आहे, त्यामुळेच आम्ही ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण करून घेतले पाहिजे. केंद्र सरकारने मनावर घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. संसदेत दोन तृतीयांश खासदारांपेक्षा अधिक संख्याबळ नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकारात्मक आहेत, पंतप्रधान मोदी भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यांनी ती केली पाहिजे.
शिक्षण संस्था, साखर कारखानदारीत आपण पुढे आहे. उद्योगातही पुढे गेले पाहिजे. स्वत: मजबूत नसलो तर समाज मजबूत करता येणार नाही. मराठा समाज कमजोर आहे, असे समजू नका. मोठी ताकद आहे, ती दिल्लीपर्यंत दाखवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही शाहू छत्रपती यांनी केले.
आंदोलन संयमाचे व सर्वांना घेऊन जाणारे असावे
कोणत्याही प्रश्नांवरील आंदोलन हे संयमाचे, शांततेत व सर्वांना सोबत घेऊन जाणारे असावे. असे आपण खासदार संभाजीराजे यांना सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केल्याचे कौतुक वाटते, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले.