विश्वास पाटीलकोल्हापूर : सोलर नेटमीटर रूपटॉप यंत्रणा बसविण्यासाठी किमान किलोव्हॅटमागे पाच हजारांपर्यंतची रक्कम महावितरणचे अधिकारी घेत असल्याच्या तक्रारी आहेत. शुक्रवारी अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास त्यांच्या चक्क कार्यालयातच लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने या तक्रारींवर शिक्कामोर्तब झाल्याचेच मानण्यात येते. सोलर यंत्रणा बसवून देणाऱ्या लोकांतील स्पर्धाही लाच देण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचेही अनुभव आहेत.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके यांना सहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. तो प्रकल्प दहा किलोव्हॅटचा होता. तक्रारीत किलोव्हॅटमागे शंभर रुपयांची लाच मागितल्याची म्हटले असले तरी वस्तुस्थिती त्याहून वेगळी आहे. किलोव्हॅटमागे ही रक्कम पाच हजार इतकी आहे. परंतु जसे किलोव्हॅट वाढत जातील तसे रक्कम न वाढवता ढोबळ रक्कम घेऊन तोडपाणी केले जात असल्याचे समजते.
कुटुंबात आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सर्रास छतावर सोलर यंत्रणा बसवून घेतली जाते. त्यातून सोलर बॅटरीचा पर्याय आला परंतु त्यातून फक्त वीज आणि फॅनसारखीच उपकरणे वापरता येऊ लागली. त्यामुळे पुढच्या टप्प्यात घरासाठी लागणाऱ्या विजेसाठीच सोलरचा पर्याय पुढे आला. तुमच्या घराचे वर्षभरातील सरासरी वीज वापर किती हे मागील बिलावरून तपासले जाते व त्यावरून किती किलोवॅटचा प्रकल्प बसवावा लागेल हे सुचविले जाते.
वीज वापर शंभर युनिटचा असेल तर कमीत कमी १२० युनिटचा प्रकल्प बसविला जातो. त्याहून कमी वीज वापराचा प्रकल्प उपलब्धच नाही. हा प्रकल्प मंजुरीसाठी हेलपाटे सुरू होतात मग ते टाळण्यासाठी लाच देऊन काम लवकर मंजूर करण्याचा व्यवहार सुरू झाला. कोल्हापूर परिमंडळलघुदाब सोलर पीव्ही सिस्टीम (कंसात उच्चदाब)
- घरगुती, कमर्शियल,औद्योगिक व इतर प्रकारांतील एकूण प्रकल्प : ७२७ (७३१)
- या प्रकल्पांचा लोड केव्हीमध्ये : ७७८७ (११३६२)
असा असतो प्रकल्प
- एक किलोव्हॅट क्षमतेची यंत्रणा बसविल्यास दिवसाला सरासरी ४ युनिट वीजनिर्मिती.
- या यंत्रणेसाठी किमान ८० हजारांपासून लाख रुपयांपर्यंत खर्च
- शासनाने निश्चित करून दिलेला दर ५५ हजार
- प्रकल्पाचे किमान आयुष्य २० वर्षे
- नामांकित कंपन्यापेक्षा स्थानिक पातळीवर साहित्य घेऊन यंत्रणा जोडून देण्याची स्पर्धा तीव्र
- वीज तयार करून महावितरणला पुरवायची व त्यांच्याकडून त्या बदल्यात वीज घ्यायची, असा व्यवहार
- या यंत्रणेसाठी वीजपुरवठा किती झाला याची नोंद करणाऱ्या बाय डायरेक्शनल मीटरची गरज