अनिल पाटील
मुरगूड : हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते मंदिरात ही न शोभणारी वक्तव्ये करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आदर्श कागलची बदनामी करीत आहेत. आपण काय बोलतो याचे भान त्यांनी ठेवावे, अन्यथा कागलची जनताच येत्या काळात त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. मुरगुड येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी समरजित घाटगे यांचा ओबीसी आरक्षण, प्रामाणिकपणे कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व वीज बील सवलतीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल नागरिकांनी सत्कार केला. यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील उपस्थित होते.यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, एकीकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेता तर दुसरीकडे अशोभनीय वक्तव्य करता. तुमच्या सांगण्यावरून तुमचे बगलबच्चे महिलांच्या बाबतीत अवमानकारक एकेरी वक्तव्ये करतात. आम्ही ही जशास तसे उत्तर देऊ शकतो, परंतु आमच्यावर संस्कार आहेत.कागलचे मतदार निवडणुकीची वाटच पाहत आहेत - मुश्रीफसमरजीत घाटगे यांनी निवडणूक लढवून मुश्रीफांना पराभूत करून आमदार होणार असल्याचे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी सहा निवडणुका लढवून जिंकल्या आहेत. आता अडीच वर्षांनी होणारी विधानसभेची निवडणूक सातवी आहे. लोकशाहीमध्ये कोणासही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. कागलचे मतदार निवडणुकीची वाटच पाहत असून, ते निवडणुकीत योग्य तो निर्णय घेतील असे म्हटले होते.गेल्या दोन दिवसापासून हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यात टीकाटीपण्णी सुरु झाल्याने कागलमधील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीला अवधी असला तरी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची ही रंगीत तालीमच सुरु झाली असल्याचे म्हणावे लागेल.