चंदगड : देशासमोर एक कणखर नेतृत्व म्हणून मोदींच्याकडे पाहिलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सव्वीस पक्षाची खिचडी आहे. त्या इंडिया आघाडीत फक्त इंजिन आहेत, त्यात फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा आहे. सामान्य जनतेला त्यामध्ये अजिबात जागा नाही. तुमच्यासाठी जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही संजय मडंलिकांच बटण दाबता त्यावेळी कोल्हापूरच्या विकासाची बोगी या इंजिनला जोडली जाते, मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीही थांबू शकणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी या मतदारसंघाचा विस्तार, इथली औद्योगिक, पर्यटन विकासासाठीचा सविस्तर आढावा प्रास्ताविकात मांडला. आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एमआयडीसीची मागणी केली. यावर उद्योगमंत्री सामंत यांनी निवडणुकीनंतर लगेच हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एमआयडीसी नाही तरी त्यासोबतच मोठे उद्योग या ठिकाणी देऊ, पाटील तुम्ही काळजी करू नका असं सांगितलं. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, समरजितसिंह घाटगे, भरमूअण्णा पाटील, हेमंत कोलेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार विकास महात्मे, संग्राम कुपेकर, अशोक चराटी, अनिता चौगुले, शांताराम पाटील, नामदेव पाटील, संतोष तेली, अनिरुध्द केसरकर यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष राहूल देसाई यांनी आभार मानले. विधानसभेचा कोणताही शब्द मागू नका पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सध्या महायुती म्हणून आपण तीनही पक्ष एकत्र आहोत. विधानसभेला पुन्हा आपण एकमेकांसमोर उभे राहणार आहोत. त्यामुळे सध्यातरी उमेदवार मंडलिक यांना पाठिंबा देताना विधानसभेचा कुठलाही शब्द मागून अडचणीत आणू नये. त्यामुळे आता आपण एकत्र काम करून मंडलिक यांना मदत करूया, असं आवाहन केले.चंदगडचं भलं करायला बावड्याची गरज नाही महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे डमी उमेदवार असून त्यांचे प्रवक्ते यांच्या हातात त्यांची सर्व सूत्रे आहेत. ते बावड्यात बसून चंदगड तालुका दत्तक घ्यायला निघालेत. त्यामुळे एक दत्तक प्रकरण गाजत असताना चंदगडचं भलं करायला बावड्याच्या लोकांची गरज नसल्याचा टोला आमदार राजेश पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.
इंडिया आघाडीत फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 7:27 PM