सचिन भोसले ।सध्या आयपीएल आणि महिन्याच्या शेवटी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेटचे वारे वाहू लागले आहे. यासह गेले कित्येक वर्षे महाराष्ट्र रणजी सामन्यात अपेक्षित अशी कामगिरी केलेली नाही. केदार जाधवचा अपवाद वगळता आजच्या घडीला एकाही महाराष्ट्रीयन खेळाडूची भारतीय संघात वर्णी लागलेली नाही. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आलेले महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार शंतनु सुगवेकर यांच्याशी साधलेला थेट संवाद.राज्यातील क्रिकेटची सद्यस्थिती काय आहे ?
उत्तर : सध्या राज्यात पूर्वीसारख्या स्पर्धा होत नाहीत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धा होत नाहीत. विशेष म्हणजे रणजी संघातील संभाव्य खेळाडू निवडण्यासाठी जिल्हा निमंत्रित संघांची स्पर्धा फेबु्रवारीमध्ये होते. तर त्यातून निवडला जाणारा संघ नोव्हेंबरमध्ये राज्याचे रणजी स्पर्धेत प्रतिनिधीत्व करतो. या दरम्यानच्या कालावधीत खेळाडूचा परफॉर्मन्स कितपत टिकून राहील, याबाबत शंका असते; त्यामुळे रणजी करंडक स्पर्धेत अपेक्षित कामगिरी होत नाही.
क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी काय केले पाहिजे ?उत्तर : सर्वांत आधी राज्यातील प्रत्येक क्रिकेटपटूंनी मनाशी ठरविले पाहिजे की, मला महाराष्ट्र संघासाठी खेळायचे आहे. त्यापुढे मला राष्ट्रीय संघासाठी खेळायचे आहे. हा अॅटिट्यूड ठेवल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. सातत्य हीच तर क्रिकेटची खासियत आहे.महाराष्ट्र रणजी का जिंकू शकत नाही? उत्तर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनने प्रशासन आणि क्रिकेट हे दोन वेगळे भाग केले आहेत. त्यांनी सलग दोन वर्षे रणजी विजेतेपद पटकाविले आहे. ही किमया करण्यासाठी त्यांनी गेली सहा ते सात वर्षे कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्र संघालाही रणजी चषक स्पर्धेसाठी संघ निवडीचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे.संडे स्पेशल मुलाखतसुगवेकर यांची कारकीर्दशंतनु यांनी १९८७ ते २००१ या १४ वर्षांच्या कालावधीत १९ वर्षांखालील भारतीय संघातून आॅस्ट्रेलियाविरूद्ध प्रतिनिधीत्व, तर रणजी, दुलिप करंडक, इराणी करंडक महाराष्ट्रकडून प्रतिनिधीत्व, कर्णधार पद सांभाळले. स्पर्धेत सार्क चषकमध्ये भारतीय संघाकडून बांग्लादेशविरूद्ध प्रतिनिधीत्व केले होते, तर बीसीसीआय बोर्ड अध्यक्षीय संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. मध्यप्रदेश संघाविरोधात रणजीमध्ये नाबाद २९९ खेळी सर्वोत्कृष्ट खेळी ठरली आहे, तर प्रथमश्रेणीचे एकूण ८५ सामने खेळले आहेत. यात ६५८३ धावा ६१.१० सरासरीने केल्या आहेत. २००४ मध्ये १६, १९ व रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.