पेठवडगाव : खेळाडूंनी खेळात रुची निर्माण करून खेळल्यास भविष्यात चांगले खेळाडू घडतील. असे खेळाडू देशाचे नाव निश्चित उज्ज्वल करतील. यासाठी पालकांनी, शिक्षकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. संस्थेने हॉकी खेळाडूंसाठी दिलेले योगदान प्रेरणादायक आहे, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार व पद्मश्री धनराज पिल्ले यांनी केले.शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी गुलाबराव पोळ होते. यावेळी भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार शांताराम जाधव, नगराध्यक्षा विद्या पोळ, प्राचार्य शिवाजीराव पाटील, प्राचार्य मधुकर बाचुळकर, प्राचार्या श्रुती महाजन, मुख्याध्यापिका शोभा देसावळे, उपप्राचार्या स्नेहल नार्वेकर, उपप्राचार्य शिवाजीराव मोहिते उपस्थित होते.यावेळी शांताराम जाधव म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांना जो खेळ आवडतो त्याच खेळाला प्रोत्साहन द्यावे. तसेच खेळाडूंनी जिद्द, कष्ट व चिकाटी बाळगल्यास यश निश्चित मिळेल. माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले, उद्योन्मुख खेळाडूंचे कौतुक केल्यास ते चांगले कौशल्य दाखवतील. यावेळी आग्रा येथे झालेल्या १९ व २५ वर्षांखालील गटात हॉकी खेळात महाराष्ट्र संघाकडून खेळताना संस्थेच्या १४ खेळाडूंनी संघाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल तसेच बळवंतराव यादव हायस्कूलचा उद्योन्मुख हॉकी खेळाडू अर्जुनसिंह भोसले यांची रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी अभिज्ञा पाटील हिने दिल्ली व मुंबई येथे झालेल्या नेमबाज स्पर्धेत दोन सुवर्ण व तीन रौप्यपदके प्राप्त केल्याबद्दल या सर्व खेळाडूंचा, पालकांचा व प्रशिक्षक राहुल गावडे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य मधुकर बाचूळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
...तरच खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करतील
By admin | Published: October 28, 2015 11:01 PM