आजरा : गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्या. त्यामुळे गावे स्वावलंबी होतील व शहरे सुरक्षित राहतील. तणनाशक व खतांच्या अतिवापरामुळे दूषित माती व पाणी झाले असून त्याचा विकास व पर्यावरणावर परिणाम होत आहे. हे थांबवले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन पद्मश्रीप्राप्त सरपंच पोपटराव पवार यांनी केले.आजरा तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ काकडे होते.लोकशाही प्रक्रियेने गावे बिघडण्याऐवजी गावांना संघटित करा. ग्रामस्थांचे विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करा. तालुक्यातील एका गावाने केले तर मोठी चळवळ तयार होते. या चळवळीतूनच गावाला समृद्ध करा. राज्यातील यशस्वी योजना दिल्लीने स्वीकारल्या आहेत. राज्य व केंद्राकडून मिळालेले अनुदानात ग्रामस्थांचा २५ टक्के हिस्सा असलाच पाहिजे असेही पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी सांगितले.काकडे म्हणाले, प्रत्येक सरपंचाने गावातील माती व पाण्यासाठी काम करावे. तरच गावे विषमुक्त होवून आर्थिक उन्नती होईल.यावेळी तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास मारूती मोरे, मुकुंद देसाई, तहसिलदार विकास अहिर, राजू पोतनीस, संतोष बेलवाडे, लक्ष्मण गुडुळकर, शंकर कुराडे, अमोल बांबरे, वैशाली गुरव, निवृत्ती कांबळे आदींसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. जी. एम. पाटील यांनी स्वागत केले. संभाजी सरदेसाई यांनी प्रस्तावित केले.आदर्श गाव व निधीआजरा तालुक्यातील दोन गावे आदर्श करण्यासाठी आम्हाला द्या. आमची टीम येवून गावसभा घेवून मार्गदर्शन करेल. शासनाकडून आदर्श गाव जाहीर झाले की ८ कोटींचा निधी मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.जास्त काम जास्त मतांनी पराभूतसरपंचांनी गावात सर्वात जास्त काम करतो तोच पुढल्या निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी पराभूत होतो. हा महाराष्ट्रातील अनेक गावाचा इतिहास आहे. कारण लोकांची विकासाकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. त्यामुळे कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणेसाठी प्रयत्न करा. आपल्याला लोक पुन्हा निवडून देतील असे काकडे यांनी सांगितले.
..तरच गावे स्वावलंबी होतील अन् शहरे सुरक्षित राहतील, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांचे स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 1:19 PM