लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भारतात चांगल्या प्रकारचे प्रतिभा व संसाधन आहे. स्थानिक गरजा आणि बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन उद्योजकांनी नवीन संकल्पना मांडून त्यानुसार वाटचाल केली, तरच आपण खऱ्याअर्थाने ‘आत्मनिर्भर भारत‘ उभारू शकू, असे प्रतिपादन भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्यावतीने रविवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत हाेते.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, उद्योग आणि भाषा याचे वेगळे नाते आहे. जपान, जर्मनी, फ्रान्स देशांच्या प्रगतीचे रहस्य त्यांची भाषा आहे. भाषा एक साधन असून ते संस्कृतीचे वाहन आहे. रशिया, चीनने इंग्रजी भाषा स्वीकारली नाही. भारतात मात्र याबाबत विचार होणे अपेक्षित आहे. प्रगत देशांनी फेकून दिलेल्या गोष्टी आपण कवटाळून बसल्याने प्रदूषणासह इतर समस्यांना आपणाला सामोरे जावे लागते.
कोविडच्या काळात उद्योगाची चाके थांबली, हे सगळ्या जगात झाले. मात्र त्यातून बाहेर पडून पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, काेविडच्या काळात उद्योगांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांचा वसुलीचा तगादा आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटीच्या पॅकेजची घोेषणा केली, त्याचा एकाही घटकाला लाभ झाला नाही. अडचणीतील उद्योगाला चालना देण्यासाठी बँकांसोबत बसून तडजोड करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुनील शेळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. निखिल चोरगे व नेहा चोरगे यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ. मुळे यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार राजेश पाटील, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, सचिन शिरगावकर, पल्लवी कोरगावकर आदी उपस्थित होते.
मोदींच्या घोषणांची अंमलबजावणी किती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजनांच्या नावांची यादी वाचायची म्हटली, तर ती संपत नाही. मात्र कल्पना आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी यामध्ये खूप फरक असल्याने योजनांचा फायदा सामान्यांना किती झाला, हे पाहणे गरजेचे असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
‘संशोधन केंद्रा’साठी १०० काेटीचा निधी मिळावा
‘गोशिमा’ संशोधन आणि विकास केंद्र विकसित करत असून त्यासाठी १०० कोटीची गरज आहे. सरकारकडून हा निधी मिळण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न व्हावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली.
फोटो ओळी :
‘गोशिमा’च्यावतीने रविवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या चर्चासत्रात डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजक उपस्थित होते.
(फाेटो-२६०९२०२१-कोल-ज्ञानेश्वर मुळे०१व ज्ञानेश्वर मुळे०२) (छाया- आदित्य वेल्हाळ)