कोल्हापूर : धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे; त्यासाठीच सहज साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी ओपन जिमची संकल्पना सुरू झाली आणि ती कोल्हापुरात रूजली. पत्रकारांसाठी उभारलेल्या या जीमचा फायदा नक्की होईल. समाजहिताची पत्रकारिता करत असताना स्वत:च्या आरोग्याकडेही पत्रकारांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.कोल्हापूर प्रेस क्लबच्या आवारात उभारण्यात आलेल्या ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी सकाळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.क्षीरसागर म्हणाले, आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर आपण रुग्णालयाची पायरी चढतो. त्यावेळी अख्खे कुटुंब हतबल होते. त्यासाठी घरातील सोने आपल्याला प्रसंगी गहान ठेवावे लागते; त्यामुळे आरोग्य चांगले व्हावे यासाठी व्यायामाची गरज आहे. पत्रकारांची दैनंदिनी धकाधकीची असते. अशा वेळी त्यांना फावल्या वेळात व्यायाम करता यावा; यासाठी प्रेस क्लबच्या आवारात जिम उभारली आहे.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिमला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे प्रमुख उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव बाळासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष समीर मुजावर यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.