पेठवडगाव : कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून गुढीपाडवा, रमजान ईद अशा सणानिमित्त सोमवारी ते शुक्रवार वडगाव बाजारपेठ खुली ठेवावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष विद्या पोळ यांच्यावतीने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे केली आहे.
वडगाव ३२ गावांची बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात शासनाच्या विविध आदेशाचे काटेकोर पालन व्यापाऱ्यांनी केले होते. सध्याही करीत आहेत. या बाजारपेठेतील किरकोळ व्यापारी, व्यावसायिकांना रोज कमविले तरच रोजी रोटोचा प्रश्न सुटतो, अशी अवस्था आहे.
सध्याच्या आदेशानुसार मिनी लॉकडाऊन पालनही करतील; मात्र पारंपरिक गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, रमजान सण आदींच्या काळात मोठी उलाढाल होते. त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवणे नागरिकांच्या गैरसोयीचे आहे. म्हणून सोमवार ते शुक्रवारपर्यंत बाजारपेठ बंद न करता, सायंकाळ ५ पर्यंत सुरू ठेवावी. यावेळी विजय शहा, माजी नगराध्यक्ष अभिजीत पोळ,माजी उपनगराध्यक्ष आनंदा म्हेत्रस, अभिजित गायकवाड, जवाहर सलगर, शेलार सूर्यवंशी, रमेश पाटील आदी उपस्थित होते.
00000
फोटो ओळ: पेठवडगाव: येथील बाजारपेठ सोमवारपासून खुली करावी, असे निवेदन मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे करताना विजय शहा, जवाहर सलगर, आनंदा म्हेत्रस, अभिजित पोळ, अभिजीत गायकवाड आदी उपस्थित होते.