कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरुवातीच्या काळात अधिक जोमाने झाली खरी, परंतु गेल्या पाच-सहा महिन्यांत ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे. शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची खुलेआम विक्री होत आहे. या अवैध पिशव्यांच्या विक्रीकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, ओल्या व सुक्या कचऱ्यातील त्याचे प्रमाणही वाढत असल्याने निदर्शनास येत आहे.
महाराष्ट्रात भाजप -शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक बंदीचा कायदा केला. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाली. या अंमलबजावणीत कोल्हापूर महानगरपालिका आघाडीवर राहिली होती. तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या अंमलबजावणीत पुढाकार घेतला. जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाईचा त्यांनी धडका लावला. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापुरातून प्लास्टिक पिशव्या गायब झाल्या. एवढेच नाही तर प्लास्टिक विक्री करणाऱ्या कारखानदारांना आपले उद्योग बंद ठेवावे लागले. कचऱ्यातून प्लास्टिक बंद झाले. शहरातील नाल्यातील प्लास्टिक दिसेनासे झाले.
मार्च महिन्यापासून महापालिका आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष कोविड १९ चा प्रतिकार करण्याकडे वेधले गेले. लॉकडाऊननंतर साथीचा फैलाव वाढला तसे प्लास्टिकच्या विक्रीकडे दुर्लक्ष झाले. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आणि प्लास्टिकची बंदी विस्मृतीत गेली की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती शहरभर पहायला मिळत आहे. प्रत्येक हातगाडीवर, फळ विक्रेत्यांकडून सर्रास बंदी असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, बसस्थान, महापालिका, महाद्वार, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी, गंगावेश, रंकाळवेश येथील फळ विक्रेत्यांकडे अशा पिशव्यांचा वापर होत आहे.
एक महिन्यात २० जणांवर कारवाई -
शहरात गेल्या महिन्याभरात प्लास्टिक बंदीच्या कायद्यानुसार २० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाली. प्रत्येकाकडून पाच हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. परंतु ही कारवाई एकदम तोकडी आहे. महिन्याभरात २० म्हणजे दिवसाला एकही कारवाई झालेली नाही. चार पथके कार्यरत आहेत. तरीही कारवाईत शिथिलता येणे म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे.
मोठ्या प्रमाणात कारवाई करणार-
कोविड १९ ची साथ आणि या साथीच्या काळात मोठ्या प्रमाणात कामाचा व्याप वाढल्यामुळे प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले ही वस्तुस्थिती आहे, परंतु आता आम्ही लवकरच प्लास्टिक विरोधी कारवाई मोठ्या प्रमाणात राबविणार आहोत. चार पथके तयार केली आहेत. शहरातील प्लास्टिक विक्री, उत्पादन पूर्णपणे बंद होईल, असे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांनी सांगितले. दुकानदार, व्यापारी तसेच नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर टाळून कारवाईचा कटू प्रसंग ओढवून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.