लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील संभाजीनगर गजानन महाराज नगरातील रि. स. नंबर ६९४ ही जागा १९९५ सालीच खरेदी केली आहे. ही जागा महापालिकेची ओपन स्पेस नाही. त्यामुळे या जागेवर ओपन स्पेस म्हणून लावलेला फलक तातडीने काढावा, अशा मागणीचे निवेदन जागेचे मालक बापू केदारी शेळके ( रा. इस्पुर्ली, ता. करवीर ) यांनी महापालिकेच्या आयुक्तांच्या नावे दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, सन १९७६ च्या अर्बन कायद्यानुसार रि. सं. नंबर ६९४ आणि ७१३ मधील दोन एकर जागा बाळाबाई चिले व त्यांच्या ती मुलांच्या नावे होती. ही जागा अर्बन लँडमुक्त झाली आहे. ही जागा १९९५ साली चिले यांच्याकडून मी खरेदी केली आहे. जागा प्रत्येकी २ हजार चौरस मीटरप्रमाणे मिळालेली आहे. त्यामुळे महापालिकेस ओपनस्पेस सोडायचा कायद्याने संंबंधच येत नाही, असा कोर्टाचा आदेशही झाला आहे. या माझ्या जागेत बांधकाम परवानगी द्यावी, असा आदेश महापालिकेस कोर्टाने दिले आहेत. नगरातील कॉलनीत ओपनस्पेस म्हणून २ हजार चौरस मीटर म्हणजे अर्धा एकर जागा कब्जेपट्टी करून महापालिकेच्या नावे सातबाराही करून दिला आहे. तिथे हॉल बांधण्यात आला आहे.
चौकट
२० लाख मागणीचा आरोप
एका माजी नगरसेवकाने माझ्याकडे २० लाख किंवा १ हजार चौरस फूट जागा मागितली होती. हे केले तर तुम्हाला महापालिकेत कोणतीही अडचण येऊ देत नाही, असे मला सांगितलं होते. ही त्यांची मागणी अमान्य केल्याने महापालिकेत तक्रार करून माझे काम होऊ देत नाहीत, असा आरोपही शेळके यांनी निवेदनात केला आहे. मला त्रास देणाऱ्या नगरसेवकाने सध्या राहत असलेले घर २०१९ मध्ये बांधले आहे. ते बेकायदेशीर आहे. महापालिकेने त्याचीही चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.