कसबा बावडा : पूरग्रस्त सभासद शेतकऱ्यांना राजाराम कारखान्याच्या वतीने होत असलेली मदत पाहून विरोधकांना पोटशूळ उठला आहे. प्रत्येक ठिकाणी नकारात्मकता शोधणाऱ्या विरोधकांची स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही ही प्रवृत्ती आहे, अशी टीका कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे. राजारामवर टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना कसलीही तातडीची मदत केली नाही. उलट आम्ही मदत करत असताना त्यावर आक्षेप घेतला जात असल्याचेही पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. राजाराम साखर कारखान्याच्या सभासदाभिमुख योजनांवर टीका म्हणजे सभासदविरोधी भूमिका असल्याचेही ते म्हणाले. महापुराच्या कठीण परिस्थितीत अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आधार देणे गरजेचे होते हे लक्षात घेत राजाराम कारखान्याने ऊस रोपे व बियाणे देण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर विरोधकांनी चोराच्या उलट्या... पद्धतीने कांगावा सुरू केला. शेतकरी सभासदांना दिलेली साखरही आमच्या विरोधकांना कडू लागत असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.
चौकट : जे टीका करत आहेत त्यांची पात्रता काय? आणि आता हे लोक राजाराम कारखान्यावर टीका करतात म्हणजे लबाडीची हद्दच झाली. छ. राजाराम कारखान्यात योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान राखायची परंपरा आहे. त्यामुळे कै. भगवानराव पवारांचे नाव ऊस विकास योजनेला देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकीय रंग देऊन सभासदांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असेही दिलीप पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.