कोल्हापूर : जळगाव महापालिकेचा निकाल पाहता विरोधकांनी आता राजकारण सोडावे, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील विजयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.या दोन्ही निकालांमुळे खुशीत असलेले पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षांत नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या पोटनिवडणुकीपर्यंत जेवढ्या निवडणुका लागल्या त्या त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता यावेळी नक्की भाजप हरणार असे ओरडत राहिली; परंतु लोकांचा भाजपवर अजूनही विश्वास आहे. ही कुणाचीही जहागिरी नाही. त्यांचीही नाही आणि आमचीही नाही. काम करणाऱ्यांची आहे हे यातून स्पष्ट झाले आहे.सर्वत्रच भाजपविरोधी वातावरण असल्याचा भास निर्माण केला गेला; मात्र आमचे सरकार काम करत आहे. त्यांना आणखी वेळ द्यायला हवा अशीच लोकांची भावना असल्याने त्यांनी हा विश्वास दाखवल्याने या दोन्ही शहरातील नागरिकांचे मी आभार मानतो.
आंदोलकांनीच नेत्यांना एकत्र आणावंठिकठिकाणी आंदोलन चालू आहे; त्यामुळे नेमकी कुणाशी चर्चा करणार असा प्रश्न विचारला असता मंत्री पाटील म्हणाले, आम्ही नेत्यांना एकत्र करायला गेलो तर अंगावर येईल. त्यापेक्षा आंदोलकांनीच नेत्यांना आता एकत्र आणले पाहिजे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आंदोलक नेत्यांनी याचा विचार करावा.गेल्यावेळेसारखी फसवणूक होण्याची नेत्यांना भीती वाटते, असे सांगितले असता पाटील म्हणाले, फसवणूक कशी होईल. अंमलबजावणीसाठी एकत्रच ताकद लावू. या सगळ्यातील त्रुटी आम्ही दूर करत आहोत; त्यामुळे तहात हरणे वगैरे बोलण्याची गरज नाही. आम्ही ‘आॅन टेबल’ सगळी प्रक्रिया मांडतो.