कोल्हापूर : आर्थिक मंदी असली, तरी देखील आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची नक्की संधी आहे. उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजमधील पॉलिस्टर म्यॅन्युफॅक्चर विभागाचे प्रमुख वसंत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी उद्यमनगर येथील माधवराव बुधले सभागृहातील त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘उद्योगांसमोरील आव्हाने’ असा होता. वसंत पाटील म्हणाले, सरकारने गेल्या नऊ महिन्यांमध्ये ६४ बिलियन डॉलर इतकी परकीय गुंतवणूक केली असून, त्याद्वारे आर्थिक मंदीमधून सावरण्यासाठी मदत होईल. या मंदीच्या स्थितीतही भारतातील शेअर बाजार स्थिर असल्याने अर्थव्यवस्था नवी भरारी घेईल, असे वाटते. त्यामुळे फारसे घाबरण्याची गरज नाही.
या कार्यक्रमास उद्योजक रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, व्ही. एन. देशपांडे, सचिन मेनन, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, इंजिनिअरिंग असोसिएशनचे हर्षद दलाल, कमलाकांत कुलकर्णी, नरेंद्र माटे, दिनेश बुधले, डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी, प्रदीपभाई कापडिया, मोहन पंडितराव, शिवाजीराव पोवार, संजय पेंडसे, आदी उपस्थित होते. इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अतुल आरवाडे यांनी स्वागत केले. नितीन वाडीकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष रणजित शहा यांनी आभार मानले. दरम्यान, वसंत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. गेल्या २८ वर्षांपासून ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहेत.अर्थसंकल्पाबाबत पाटील यांचे अंदाज* कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात होईल.* उद्योगांवरील करांमध्ये आणि वैयक्तिक प्राप्तिकरात दिलासा मिळू शकतो.* लाभांशांवरील (डिव्हिडंड) करामध्ये सुधारणा होईल.* उद्योगांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद.
- संशोधन, नवतंत्रज्ञानावर खर्च करा. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील हा समज चुकीचा आहे. कारण रोबोट तयार करण्यासाठी सुद्धा नवीन उद्योग उभारणी करावी लागते. त्यासाठी मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. संशोधन आणि नवतंत्रज्ञानावर जास्तीत जास्त खर्च करून उद्योजकांनी परकीय बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.