कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी महायुतीच्या १७ उमेदवारांच्या यादीचा घोळ रात्री उशिरा मिटला. या यादीत नाईकनवरे कुटुंबातील दोघांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय साइक्स एक्स्टेन्शन, राजलक्ष्मीनगर या प्रभागांवरही तोडगा काढण्यात आला. गेल्या चार दिवसांत महायुतीच्या वतीने चार प्रभागांत उमेदवारी निश्चित करताना नेत्यांचा कस लागला होता. रविवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू होती. त्यानंतर ही यादी जाहीर करून नेत्यांनी सुस्कारा सोडला; पण कसबा बावडा परिसरातील प्रभाग क्र. ३ हनुमान तलाव आणि प्र. क्र. ५ लक्ष्मी-विलास पॅलेस या दोन प्रभागांतील निर्णय मात्र त्यांनी मागे ठेवला. भाजप-ताराराणी महायुतीने ६२ प्रभागातून उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली होती;तर अंतिम टप्प्यातील १७ उमेदवारांची यादी जाहीर करताना नेत्यांना कंबर कसावी लागली. या रात्री उशिरा जाहीर झालेल्या यादीत प्रकाश नाईकनवरे, राजाराम गायकवाड हे दोन विद्यमान नगरसेवक, तर नीलेश देसाई आणि अशोक भंडारे दोन माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली. उर्वरित काहीजणांना गेल्याच निवडणुकीत विजयाने हुलकवणी दिल्याने त्यांचा नव्याने विचार करून त्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १७ जणांच्या यादीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.या १७ जणांची यादी करताना नेत्यांचा कस लागला होता. यामध्ये प्र. क्र. १४ व्हीनस कॉर्नर या प्रभागातून विद्यमान नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, तर त्यांच्या स्नुषा पूजा स्वप्निल नाईकनवरे यांना प्र. क्र. २५, शाहूपुरी तालीम या प्रभागातून संधी दिली आहे. या दोन्हीही प्रभागांसाठी नाईकनवरे कुटुंबीयांनी ‘देत असाल तर दोन्ही प्रभागांत उमेदवारी द्यावी, अन्यथा एकीकडे नको’ अशी भूमिका घेतल्याने नेत्यांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे व्हीनस कॉर्नर प्रभागातून आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते समजले जाणारे राहुल चव्हाण यांचा पत्ता कट झाला. प्र. क्र. ५३ दुधाळी पॅव्हेलियन यामधून माजी नगसेवक (कै.) उमेश कांदेकर यांचे बंधू हेमंत कांदेकर यांना उमेदवारी देण्यात आली; तर येथून प्रतापसिंह जाधव यांना डावलण्यात आले. (प्रतिनिधी)प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्र. क्र. २४ साईक्स एक्स्टेन्शन या प्रभागातून कुलदीप देसाई यांना उमेदवारीची संधी दिली आहे; तर याच प्रभागातून माजी आमदार पी. एन. पाटील यांचे पुतणे बबलू पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांच्या उमेदवारीसाठी काही नेत्यांनी प्रयत्नही केले होते; पण कुलदीप देसाई यांनी बाजी मारली. देसाई हे खासदार धनंजय महाडिक यांचे कार्यकर्ते मानले जातात. प्र. क्र. ७०, राजलक्ष्मीनगर या प्रभागातून उमेदवारीसाठी वर्षा रमेश चावरे आणि शोभा दत्तात्रय बामणे यांच्यात रस्सीखेच होती. चावरे यांनी विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. त्यामुळे महाडिक यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी कसोशीने प्रयत्न केले; पण भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी बामणे यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली. त्यामुळे बामणे यांना उमेदवारी जाहीर झाली. विशेष म्हणजे, दत्ता बामणे हे गेल्याच निवडणुकीत अवघ्या २७ मतांनी पराभूत झाले होते. बावड्यावर नजराभाजप-ताराराणी महायुतीचे लक्ष्य हे माजी मंत्री सतेज पाटील असल्याने महायुतीच्या नेत्यांनी यादी जाहीर करताना कसबा बावडा परिसरातील हनुमान तलाव आाणि लक्ष्मी-विलास पॅलेस या दोन प्रभागांतील उमेदवारी जाहीर करण्याचे मागे ठेवले. या महायुतीचे काँग्रेसच्या बावड्यातील नाराज उमेदवारांवर लक्ष असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.मालोजीराजे समर्थकांना ‘ताराराणी’तून संधीविद्यमान नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, त्यांच्या स्नुषा पूजा नाईकनवरे तसेच प्र. क्र. १३ रमणमळा या प्रभागातून विद्यमान नगरसेवक राजाराम गायकवाड यांना संधी दिली आहे. तसेच यापूर्वीच्या यादीतून माजी उपमहापौर विक्रम जरग यांना संधी दिली आहे. हे चौघेही माजी आमदार मालोजीराजे समर्थक मानले जातात; पण ते सध्या ‘ताराराणी’त सहभागी झाले आहेत.बसुगडे, विकी महाडिक यांनाही डावललेप्रभाग क्र. ४१, रंकाळा स्टँडमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक संभाजी बसुगडे आणि विकी महाडिक यांच्यात रस्सीखेच होती; पण येथे दोघांच्या वादात शेखर श्रीकांत कुसाळे या युवा उद्योगपतीला संधी देण्यात आली आहे.
नाईकनवरे, देसाई, बामणे यांना संधी
By admin | Published: October 05, 2015 1:07 AM